सामाजिक जबाबदारी – प्रसिद्धी माध्यमे आणि आपण

उपक्रम या संकेतस्थळावर मी हि चर्चा सुरु केली होती. संपुर्ण चर्चा आणि उपक्रमींचे प्रतिसाद येथे पाहता येतील. आपण आपली मते येथे सुद्धा व्यक्त करु शकता…

बाँब स्फोट, गोळीबार, हल्ला हे हल्लीचे सर्वात जास्त वाचले जाणारे, ऐकले जाणारे शब्द आहेत. वाचेल् जातात वृत्तपत्रात, महाजालावर आणि ऐकले जातात दृकश्राव्य माध्यमांवर. जे वाचले जाते आणि पाहिले जाते त्याने समाज मनावर खुप खोलवर परिणाम होतात. ब्रेकिंग न्युज देणे हे आद्य कर्तव्य असणार्‍या प्रत्रकाराला/वार्ताहाराला आपण आपले कर्तव्य चोख पार पाडतो आहोत असेच वाटणे सहाजिक आहे. पण ते करत असताना आपण नक्की काय करतो आहोत. त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केला जातो?
तंत्रज्ञानच्या सोबतीने आज अनेक वृत्त वाहिन्या आहेत. वाहिनीचा कॅमेरामन नसेल तर मोबाईलवर ऑखोदेखा हाल देणे सुरु असतेच. एखादी बातमी घातक प्रतिक्रियांची साखळी बनवू शकते हे त्यांना कळत नाही का? हल्ली हेच विचार प्रत्येकाच्या मनात असतील. जे घडते आहे ते पहायला मिळत असल्याने या वाहिन्या पाहण्याचा मोह सुद्धा टाळला जात नाही. मन अस्वस्थ होऊन जाते. त्यात आणखी भर म्हणून मग घडलेल्या घटनेवर राजकिय नेत्यांच्या प्रतिक्रिया. प्रसिद्धी माध्यमाचा वापर स्टंटगिरी करण्यासाठी होतो. या सर्वांमध्ये सामान्य माणसाचे विचार अक्षरशः गुदमरुन जातात. तुम्हाला काय वाटते?

1. आजच्या घडीला प्रसार-प्रसिद्धी माध्यमांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता?
2. एखाद्या गोष्टीचे वार्तांकन करणे ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे असे आपल्याला वाटत नाही का?
3. जे अनिवासी भारतीय आहेत त्यांचा भारता बाहेर काय अनुभव आहे?
4. हे प्रभावी माध्यम आहे हे आपण जाणतो. आजच्या घडीला आपण त्याचा कसा वापर करु शकतो?

असे अनेक मुद्दे आहेत जे आपल्याला येथे मांडता येतील. या चर्चेच्या निमित्ताने आपण ते येथे जरूर मांडावेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वृत्तपत्रांनी खुप महत्वाची आणि मोठी भुमिका निभावली आहे. हे प्रभावी माध्यम आहेच. ज्या काळात साक्षरता कमी होती त्यावेळचा या माध्यमाचा प्रभाव आपण वाचला आहे तर काहींनी अनुभवला आहे. आजच्या भारताला देखील या प्रभावी माध्यमाचा जबाबदारीने वापर करायचा आहे. लोकशिक्षणासाठी, देशप्रेमाचे. सेवेचे धडे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी. मित्रहो, आपण येथे लिहितो, वाचतो. महाजाल हे सुद्धा प्रभावी माध्यम आहेच. पण भारतात आज सुद्धा ते तळागाळा पर्यंत गेलेले नाही. भारतात आज सुद्धा वर्तमान पत्र जास्त प्रभावी आहे. आपण आपले विचार येथे जरुर मांडावेत. महाजालावर अनेक वृतपत्र संपादक/वार्ताहर वावरत आहेत. त्यांनी सुद्धा अशा उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. तर घ्या लेखणी/कळफलक आणि आपले विचार येथे मांडा. असे विचार मंथन करायचा हा पहिलाच आणि पण थोडा विस्कळीत प्रयत्न आहे. अनुभवानुसार त्यात बदल केले जातीलच. पण कुठेतरी सुरुवात व्हायला हवी. चला तर मग…



पुरोगामी कोल्हापूर आणि बेगडी धर्मांधता

गेले काही दिवस/आठवडे/महिने कोल्हापूरातला विश्वशांती यज्ञ गाजतो आहे. गाजायला तशी वेगवेगळी कारणे आहेत. कोल्हापूरचा पुरोगामीपणा दाखवण्यात तेथील राजकारणी एकदम सरसावले आहेत. नाण्याचा दोन्ही बाजूंप्रमाणे यज्ञ विरोधक आणि समर्थक आपापल्या मुद्यांसह पुढे येत आहेत. उपक्रम सारख्या संकेतस्थळांवर यावर चर्चा सुद्धा झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व पातळीवर विरोध करुन सुद्धा हा यज्ञ पार पडतो आहे. असा हा यज्ञ होणे हा काही प्रमाणात लोकशाहीचा विजय मानला पाहिजे. कधी नव्हे ते हिंदू धर्मातल्या काही गोष्टींना विरोध करणे याला कोल्हापूरात पुरोगामीपणा मानले जाते त्या कोल्हापूरात विरोध होऊन सुद्धा हा यज्ञ पार पडतो आहे. अनेकांनी मुद्दे मांडले. त्यातला सर्वात चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे अन्न पदार्थांची नासाडी. मी सुद्धा या कारणासाठी आक्षेप नोंदवेन. पण विरोध नाही. नासाडी न करता काही करता येत असेल तर जरुर करा.

कोल्हापूरात या गोष्टीचा कर्मकांडाचे स्तोम असा प्रचार सुरु आहे. जो आम्ही वृत्तपत्रातुन वाचतो आहे. पण स्वतःला पुरोगामी म्हणणारे हे विरोधक पुरोगामी नाहीत तर खर्‍या अर्थाने धर्मांध आहेत असे मी तरी म्हणेन.  आपल्या भारतात धर्मवेड्या लोकांचा धर्मांध म्हटले जाते. पण धार्मिक गोष्टींना, फक्त राजकिय स्वार्थासाठी विरोध करणे अथवा फक्त एका धर्माची मते मिळवण्यासाठी त्यांची भलामण करणे या सर्वस्वी आंधळ्या कृत्ये करणार्‍यांना मी धर्मांध म्हणेन. कोणत्याही धर्माच्या एखाद्या गोष्टीचा राजकिय हेतुसाठी विरोध अथवा समर्थन याला मी धर्मांधता म्हणेन.

आता जर हा विरोध नासाडीसाठी होतो आहे तर सरते शेवटी हि अन्नाची म्हणजेच पैस्याची नासाडी झाली. मग ती काही लोकांच्या समाधानासाठी आहे तरी सुद्धा. पण हे मान्य करताना, मुठभर लोकांच्या धार्मिक यात्रेसाठी कोट्यावधी रुपयांची नासाडी कशी चालते? हा कोट्यावधीचा निधी विकास कामांसाठी नक्कीच वापरता येऊ शकतो. तसेच लोकशाहीमध्ये इतर कोणत्या धर्मासाठी अशी तरतुद सुद्धा दिसत नाही. मग हे असे करणे ही सुद्धा धर्मांधता नाही का? आणि जर हे मुद्दे हिंदू नेत्यांनी काढले तर ही धर्मांधता कशी?

थोडक्यात काय? स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणर्‍या कोल्हापुरातल्या (कोल्हापूर – गाव तसं चांगल पण वेशीला टांगल!!) नेत्यांना यज्ञाची कृत्ये धर्मांध वाटतात. पण कोल्हपूरच्या विकासाचे आणि अनेक अनुत्तरीत प्रश्न मात्र बोलावेसे वाटत नाहीत. त्यांची हि कृत्ये लोकशाही धर्माविरुद्ध नाहीत का? मी तर याच लोकांना सर्वप्रकारे धर्मांध म्हणेन….



मी आणि ओबामा

काल पासुन जिकडे पहावे तिकडे फक्त ओबामा हे एकमेव नाव दिसते आहे. ओसामा विरुद्द सुरु केलेली लढाई बुश अप्रक्षरित्या ओबामा सोबत हरला. असो. आता जे शीर्षक आहे “मी आणि ओबामा” या बद्दल.  मित्र हो, एखादा माणूस प्रसिद्ध झाला की प्रत्येकजण त्याच्याशीआपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध लावून मी पण त्याच गोत्यातल्या हे ठसवायचा प्रयत्न करतो. मी काहीसे तसेच करणार आहे. :) . घाबरू नका, वैतागु नका. मला ओबामांचे कौतुक वाटते म्हणूनच माझा आणि त्यांचा संबंध. बाकी काही एक नाही.
- “खरतर अमेरिकेतल्या मराठी लोकांच्या तिथल्या राजकिय ज्ञानासमोर माझे ज्ञान म्हणजे समुद्रातला एक थेंब. अमेरिकेत दर चार वर्षांनी अधक्षपदाच्या निवडणुका होतात आणि अमेरिका ही जगातली महासत्ता असल्याने सर्व जगाचे त्या निवडणुकांकडे लक्ष आहे. हे आमचे ज्ञान. तसेच  महासत्ता म्हणून मिरवणारे लोकं बुश सारख्या माणसाला निवडून देतात. त्यामुळे त्यांच्या राजकिय बुद्धी बद्दल काय तर्क करायचे याचे देखील आम्हाला कोडे पडते. असो, मला ओबामाचे कौतुक वाटते म्हणजे त्याने अमेरिकनांना आणि अप्रत्यक्षरित्या जगाला संदेश दिलायेस!! वुई कॅन!!” अर्थातच आम्ही ठरवलं तर नक्कीच करु शकतो.

राजकारण सगळीकडे जवळपास एक सारखंच. तरुण पिढीचे या बद्दलचे मत म्हणजे, या बद्दल काही एक केले जाऊ शकत नाही. सम्स्त मानवजातीला निराशेच्या गर्तेत फेकायाची शक्ति असलेल्या लोकांचा एक पाशवी खेळ. आमचे असे काहीसे मत गेल्या दशक भरात झाले होते. वर्ण, धर्म आणि जात यांचा आधार घेत विकासाचे मुद्दे कसे बाजूला ढकलता येतात याचे मुर्तीमंत उदाहरण द्यायचे झाले तर लोकं भारताकडे नक्कीच बोट दाखवतील. तर, अशा या राजकिय नैराश्याने ग्रासलेल्या भारताचे आम्ही नागरीक, ज्यांच्या रोजच्या रोजी रोटीचाकाही भाग अमेरिकेवर अवलंबुन होऊ लागला आहे, अशा आमचे डोळे या निवडणुकांच्या निकालाकडे लागले होते.
ओबामांनी योग्य मुद्दे योग्य प्रकारे मांडून विजय मिळवला आहे. हो!! आम्ही बदल घडवू शकतो हा विश्वास सम्स्त जगताला दिला आहे. बाकी अमेरिके संदर्भातले निर्णय ओबामा घेतीलच. पण त्याच सोबत माझ्या सारख्या असंख्य तरुणांना, तुम्ही बदल घडवून आणू शकता हाविश्वास दिला आहे.
माझ्यात हा विश्वास ओबामानी ओतला आहे आणि म्हणूनच माझे आणि ओबामाचे असे काहीसे नाते आहे. आता येणार्‍या काही महिन्यात भारतात लोकसभेच्या निवडणुका आहेत. काही चमत्कार नक्कीच घडणार नाहीत. राजकिय पक्षांनी योग्य प्रकार वातावरण निर्मिती सुरुकेली आहे. या वातावरणात खरतर भारताला एका ओबामाची गरज आहे. तो कदाचित माझ्यात आहे, तुमच्यात आहे. कदाचित या निवडणुकीत एका ओबामाचा जन्म होणार आहे. अन येत्या दशकात भारताला धर्म/जात/भाषा यांच्या तंट्यातुन बाहेर काढून एका परिपक्व राष्ट्रात नेणारआहे. आशा करुयात की उद्याच्या भारतात आपण सुद्धा एक ओबामा पाहूया. आपण सुद्धा ओबामा बनुया. कारण अशक्य असं काहीच नाही. ओबामा स्वतःच म्हटले आहेत – “येस! वुई कॅन!!”

तसा राहिलो नाही!!

सोबती आता कशाला? तसा राहिलो नाही!!
आरती आता कशाला? तसा राहिलो नाही!!

थकलो जरा,  मग मी असा  थांबुन पाही,
थांबला तुम्ही कशाला? तसा राहिलो नाही!!

ऐकले तुम्ही कुणाला? जरी बोललो नाही,
भोवती येता कशाला? तसा राहिलो नाही!!

भावला मृत्यू मनाला!! तसा जगलो नाही,
गाळता अश्रु कशाला? तसा राहिलो नाही!!

थांबवा आता स्वतःला!! तसा राहिलो नाही,
गोठवा आता मनाला!! तसा राहिलो नाही!!

बाकी गुंता

जीवन ऐसे माझी चिंता!!
एकच नाते बाकी गुंता!!

आज अचानक मजला कळले!!
मी तर करतो नुसता मुजरा!!

कुणा करावी आम्ही माया?
मी तर जाणे नुसतीच काया!!

दिन ते होते तसले फसवे!!
मी ही फसलो, फसते दुनिया!!

दिसतो आहे आता चेहरा!!
कळते आहे ज्याचे त्याला!!

जगणे बनले खेळ फुकाचा!!
माझा मृत्यू, माझी सुटका!!

जीवन ऐसे माझी चिंता!!
एकच नाते बाकी गुंता!!




गेले ते गेले!!

तेल गेले, तूप गेले!!
वाढले वय, रूप गेले!!

काय बाकी वा कशाला
जायचे ते खूप गेले!!

लोकशाही पण मिळाली
विसरले मग नृप गेले!!

एक तू होतास वाल्या
राम म्हणुनी पाप गेले!!

भीम आहे देव आता
बुद्ध गाडुनी स्तूप गेले!!

वाहतुक चारोळ्या

वाहतुकीची नाही येथे,
कोणालाच शिस्त,
स्वत:च्या जीवाची आहे मात्र,
दुसर्‍यावर भिस्त

वाट पहाणर,
पण पी एम टीनेच जाणार,
पी एम टीत बसुन,
स्वत:चा जीव वाचवणार

जागा मिळेल तिथुन येथे,
प्रत्येक जण गाडी हाकतो,
नसलेल्या शर्यतीत येथे,
प्रत्येक जण असाच धावतो

पाच मिनिटांच्या घाइसाठी,
उगाचच गाळतात घाम,
प्रत्येकाच्या घाइनेच
होतो येथे ट्रॆफिक जाम

हुंदका

हुंदका साधा तुझा सांगून गेला!!
माझाच श्वास मज सोडून गेला?

म्हणे तू मज आता प्रेम नाही!!
नेत्रात अश्रू का असा येऊन गेला?

बनलेत आता सगळेच वैरी!!
भाव प्रत्येक मज का दुखवून गेला?

आता कशास मी जगतोच आहे?
अर्थ जीवनातला जरी संपून गेला?

चाणक्य असते रे प्रीत खोटी!!
नीती कधीची काळ हि विसरून गेला!!

काही नाही ठीक

लेखाचे शीर्षक वाचून काहीच उलगडा नाही ना झाला? महाविद्यालयात असताना कोणती गाडी घेणार अस म्हटलं की आमचं एक उत्तर असायचं – काही नाही ठीक. अरे हे काही नाही ठीक म्हणजे काय? मग आम्ही सांगायचो, काही नाही ठीक म्हणजे कायनेटिक. :)

भारतीय वाहन बाजारावर एके काळी अधिराज्य गाजवणारा हा उद्योग समूह आणि त्यांची एक गाडी जी फक्त कंपनीच्या नावानेच आजवर ओळखली गेली/जाते, त्या गाडीची थोडी माहिती वाचण्या पूर्वी, या कंपनी बद्दल थोडे फार …

Luna TFR Luna Super भारतीय वाहन उद्योगात फिरोदिया कुटुंबीयांचे एक वेगळे स्थान आहे. आजची फोर्स मोटर्स (अभय फिरोदिया) आणि कायनेटिक मोटर कंपनी (अरुण फिरोदिया) या दोन फिरोदिया कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. दुचाकी वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या उद्देशाने एच. के. फिरोदियांनी कायनेटिक वाहन उद्योगाची स्थापना केली. सर्व प्रथम १९७२ ला कायनेटिक लुनाचे उत्पादन सुरू झाले आणि मोपेड या वाहन क्षेत्रात कायनेटिकने आपले पाय घट्ट रोवले.

Kinetic Honda DX and ZX मग लुनाचे अनेक प्रकार झाले. लुना टिएफआर (एकाच व्यक्तीकरिता), लुना डबल प्लस, मॅग्नम, सुपर असेच आणि काही प्रकार झाले. खरंतर लुना हा वाहन प्रकार सायकलला पर्याय असा पुढे आला म्हणायला काही हरकत नसावी. एरवी आपोआप चालणारी अन गरज लागल्यास खरोखरच्या सायकल सारखी सुद्धा चालवण्याची सोय या वाहनात होती/आहे. या वाहनाला एकच स्पर्धक होता तो म्हणजे टिव्हीएस ५०. लुना नंतर कायनेटिक सफारी आली. पण कायनेटिक हे नाव जास्त लोकप्रिय झाले म्हणा अथवा त्यांचे जे वाहन फक्त कंपनीच्या नावानेच ओळखले गेले ती म्हणजे कायनेटिक स्कूटर होय. सायकल सदृश गाड्यांना, अवजड अन तोल सांभाळायला अवघड अश्या बजाज, एलएमएलच्या स्कूटर्सना सशक्त पर्याय म्हणजे कायनेटिकची स्कूटर. या गाडीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीने शहरातल्या  स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवला.

भारतीत वाहन उद्योगात ८० चे दशक म्हणजे बजाजच्या स्कूटरचा सुकाळ होता. काही पैसे भरून, 4S वाट पाहून बजाजांची स्कूटर मिळवणे म्हणजे लोकांना प्रचंड कौतुक होते. या काळातच स्त्रिया सुद्धा आत्मविश्वासाने कार्यालयीन नोकरी करू लागल्या होत्या. पण त्यांचा रोजचा प्रवास म्हणजे स्वतःच्या “ह्यांच्या” स्कूटर वरून, बसने अथवा रिक्षाने. एखादी जास्त स्वावलंबी स्त्री असेल तर लुना. पण स्कूटर म्हणजे परिवाराची गाडी होती. बदका सारखा आकार, सामान ठेवायला थोडी जागा, मोपेड पेक्षा जास्त शक्ती, सोबत गियर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती, पत्नी, एक पुढे उभे राहणारे मूल आणि एक आईच्या मांडीवर बसणारे लहान मूल अशा चौकोनी कुटुंबाला वाहून नेण्याची क्षमता ही या स्कूटर्सची ठळक वैशिष्ट्ये होती.

याच काळात भारतीय वाहन उद्योगात जपानी कंपन्यांनी प्रवेश केला. १९८४ साली कायनेटिकने जगप्रसिद्ध होंडा कंपनी बरोबर सामंजस्य स्वीकारले आणि स्कूटरचे उत्पादन सुरू केले. वर लिहिल्या प्रमाणे बजाज- एलएमएलच्या स्कूटरची ठळक वैशिष्ट्ये होतीच. पण त्याच सोबत काही वेळा स्कूटर्सची अशी काही वैशिष्ट्ये होती की जी डोके दुखी ठरायची. त्यातली काही Nova 135 म्हणजे, डाव्या हाताला सगळे गिअर्स आणि क्लच, पाय ठेवायच्या सपाट जागेत मध्येच डोके वर काढणारा मागच्या चाकाचा ब्रेक, एका बाजूला असलेले इंजिन आणि फक्त मधले स्टँड. तसेच बंद पडल्यास चालकाच्या बसण्याच्या जागे जवळ असलेला पेट्रोलचा नियंत्रक आणि चोक यांच्या मदतीने स्कूटर सुरू न झाल्यास, रस्त्यातच स्कूटर तिरकी करणे आणि मग पाय दुखे पर्यंत किक मारणे हा एक मोठा त्रासदायक मुद्दा असायचा.  या सर्व त्रासदायक बाबी लक्षात घेऊन आणि खास करून नोकरदार स्त्रिया हा ग्राहकवर्ग डोळ्यासमोर ठेवून कायनेटिक होंडाने आपली स्कूटर बाजारात आणली.

कमी पसारा असलेली, दिसायला सुंदर, काही तरी नवे वाहन असा ठसा उमटवणारी, मुख्य म्हणजे, इंजिन मध्यभागी असल्याने तोल सांभाळायला सोपी, गिअर विरहित, त्यामुळे चालवायला सहज सोपी, बसायला एकसंध आणि मोठी सीट, पेट्रोल नियंत्रकाची - चोकची कटकट नसलेली, वाहनक्षमता स्कूटर इतकीच असलेली, एका बाजूला कलून Flyte लावण्याची व्यवस्था असलेली, स्कूटर इतकीच शक्तिशाली अन सुसाट धावणारी आणि मुख्य म्हणजे किक अथवा फक्त एक खटका दाबून सुरू होणारी अशी हि स्कूटर अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. या स्कूटरने, या वाहन प्रकारात, फक्त एक खटका दाबून सुरू होणे, गिअर बॉक्स ऐवजी व्हेरीएटर (गिअर्स टाळण्या करिता), दोन्ही ब्रेक हातात, हि नवीन वैशिष्ट्ये बाजारात आणली. कायनेटिक होंडा डिएक्स आणि झेडएक्स असे दोन प्रकार उपलब्ध होते. ९८ घनसेमी क्षमतेच्या आणि टू स्ट्रोक इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये पहिला बदल झाला तो २००१ साली. इंजिनाची क्षमता ११० घनसेमी झाली. पण बाकी सगळे तेच होते. मधल्या काळात १९९८ साली होंडा कंपनीने साथ सोडली. अन स्वतःची भारतात वेगळी चूल मांडायचे मनसुबे सत्यात आणायला सुरुवात केली. मग २००५ साली कायनेटिकने बाह्य स्वरूप तेच ठेवून ११३ घनसेमी क्षमतेचे फोर स्ट्रोक इंजिन वाली हिच स्कूटर ग्राहकांसमोर आणली.  पण तोवर उशीर झाला होता. अनेक स्पर्धकांनी आपापल्या अशाच गाड्या, स्कूटरेट बाजारात आणल्या होत्या. खुद्द होंडाने ऍक्टिव्हा आणली जी ग्राहकांना आवडली.

कायनेटिकने स्पर्धा म्हणावी तेवढी योग्य प्रकार हाताळली नाही. मग ती स्कूटरेट प्रकारातली प्राइड असो,  कायनी, नोवा अथवा त्यांच्या मोटर सायकल असोत, अथवा स्टेप थ्रु,  अथवा आयात केलेल्या इतर कंपन्यांच्या गाड्या. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात कायनेटिक म्हणावी तेवढी यशस्वी ठरली नाही. आज सुद्धा कायनेटिक नव्या गाड्या सादर करत आहे.

बिपाशा बसूला घेऊन केलेल्या जाहिरातीमुळे फ्लाईट नावाची स्कूटरेट थोडी फार विकली जात आहे. पण तीन गिनेज रेकॉर्ड करणार्‍या कायनेटिक होंडाच्या स्कूटरच्या यशाची उंची गाठणे अवघडच दिसते आहे.

अरुण फिरोदियांच्या कन्या, सुलज्जा फिरोदिया-मोटवानी या कंपनीची कमान सांभाळत आहेत. पण पूर्वीचे यश अन आजची स्पर्धा पाहिल्यावर जर त्यांना कोणी विचारलं, कस काय चाललंय सगळं तर त्या नक्कीच म्हणती, फार खास असं, काही नाही ठीक…..



माझाच मी

गाव माझाच मी सोडणार आहे,
ठाव माझाच मी शोधणार आहे!!

गुंफिला प्रीतीचा गोफ तो जरी,
पाश माझेच मी तोडणार आहे!!

शत्रु नव्हतो कधी ही तुझा मी,
दंड मात्र मीच आज भोगणार आहे!!

मृत्यु नसतो प्रीतीला कदापी,
प्रेत माझेच मी जाळणार आहे!!

घाव घाला रे कुठे ही कोणी ही,
वेदना हा चाणक्य सोसणार आहे!!