नमस्कार मंडळी,
हिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात? या चर्चेमध्ये बरेच प्रतिसाद आले. वाद प्रतिवाद झाले. मुळात आवड-निवड सापेक्ष असल्याने या आणि अशा विषयांना अंत नाही. या चर्चांच्या निमित्ताने एक विषय मात्र डोक्यात आला. तो म्हणजे, राजकिय नेते हे समाजतल्या मानसिकतेचे चेहरे असतात. कोणाला कोणता नेता आणि विचार आवडावेत अथवा आवडू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण अनेक वैयक्तिक एकत्र येऊन समाज बनतो आणि विचारधारांचा अभ्यास होण्या ऐवजी दुसर्याचे उणेपण दाखवणे जास्त होते. राजकारणावर चर्चा करणे ठिक आहे. पण आपल्याला खरच या राजकिय नेत्यांसारखे बनणे जमणार आहे का? हा एक विचार आहे. कोणामध्ये इतकी हिंमत आहे की जाऊन आजचे राजकिय वैचारिक चित्र बदलता येणार आहे? कोण हरीचा लाल आहे जो म्हणतो आज भारतात सर्व छान चालले आहे अथवा सुरळीत चालले आहे?
घरापासून ते राष्ट्राच्या सर्वोच्च पदाच्या निवडी पर्यंत जो विरोध असतो तोचमुळी वैचारिक असतो. खास करून राष्ट्राचा जेंव्हा विचार असतो तेंव्हा राष्ट्राचे हित, विकास हेच सर्वांचे ध्येय असते. पण विचार प्रवाह मात्र वेगळे असतात. कोणाला कोणत्या विचार प्रवाहात सामील व्हायचे आहे तो वैयक्तिक विचारांचा भाग आहे. त्यासाठी आपण आपल्या विचारांचे समर्थन करणे योग्य. दुसर्याचे मुद्दे चुकीचेच आहेत असे मोठ्याने ओरडून आपले मुद्देच बरोबर आहेत असे नक्कीच सिद्ध होत नाही.
वर म्हटल्या प्रमाणे हे असे विषय अंतहिन आहेत. त्यापेक्षा या राजकिय नेत्यांच्या यशापयशाचा विचार केल्यास आपल्याला अनेक नवे अथवा अभ्यासपूर्ण मुद्दे मिळतील. खाली एक छोटी यादी देतो आहे. त्यातले काही नेते अलिकडचे आहेत. पण त्यांच्या राजकिय विचारांचा प्रभाव बराच परिणाम कारक आहेत. एखाद्या नेत्या बद्दल लिहिताना आपण थोडा अभ्यास करू आणि मगच लिहू. उगाच वैयक्तिक आकसापोटी नको.
- गांधीजी – जगातल्या काही महान नेत्यां पैकी एक. त्यांचे कोणते विचार असे होते ज्यामुळे काही जणांना विकृत म्हणवले जात आहे? येथे गांधीजी कसे महान होते अथवा नव्हते हा मुद्दा अपेक्षीत नाहीये. पण त्यांची हत्या/वध झाली/झाला हे सत्य आहे. आज सुद्धा त्यांच्या आडनावाचा करिश्मा आहे हे सुद्धा सत्य आहे.
- सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी – या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते. या त्यांच्या वैचारिक अपयशा बद्दल कोणते मुद्दे महत्वाचे आहेत?
- हिटलर – चर्चिल – हे दोन आणि असे काही नेत त्या काळातले जगातले सर्व प्रकारचे राजकारण ढवळून काढणारे आहेत. लोकांवर त्यांचा एवढा का प्रभाव होता? लोकांना युद्धात ढकलणारा हिटलर आणि शतकानूशतके जगातल्या अनेक राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची हत्या करणारे ब्रिटिश. यांच्यामध्ये महान कोण? अथवा जास्त विकृत कोण? फक्त रक्तपात न होणे हेच काय ते महानतेचे प्रतिक आहे काय? असे असेल तर महाकाव्यांमधले युद्ध आपण आवडीने का ऐकत आलो आहोत? ते सुद्धा विकृतच नाही का?
- नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका यांच्या मध्ये असे कोणते नेतृत्व गुण आहेत जे अनेक दशके भारतीयांना लोकशाहीचे संरक्षक म्हणून योग्य वाट आले आहेत? पर्यायी नेतृत्व शक्यच नव्हते की जनतेला दुसरे कोणी नकोच आहे की इतरांमध्ये तेवढी कुवतच नाही? या लोकांच्या यशाचे नेमके कारण काय असावे?
- लालू, मायावती, मुलायम, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे इत्यादी नेते काही जणांना प्रचंड विकृत वाटत आले आहेत आणि राजकारणात यश अपयश यांनी चाखले आहे. त्यांच्या या यशापयशाचे कारण काय असावे?
राजकिय नेत्यांची बाजू घेताना आपल्याला खरच त्यांची सर्व मते पटली आहेत का? हे कितपत महत्वाचे आहे? एखादी व्यक्ति मग ती राजकिय असली तरी त्यांचे सगळेच गुण आपल्याला आवडायला हवे आहेत का? की त्यांच्यामधले आपल्याला आवडणारे/पटणारे मुद्दे/गुण आपण घ्यावेत आणि बाकिच्यांबद्दल वाद न घालता आपण त्यांच्या विचारांना सुद्धा मान द्यावा? तुम्हाला काय वाटते?