राजकिय विचार – विकृती की आपली आवड?

नमस्कार मंडळी,

हिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात? या चर्चेमध्ये बरेच प्रतिसाद आले. वाद प्रतिवाद झाले. मुळात आवड-निवड सापेक्ष असल्याने या आणि अशा विषयांना अंत नाही. या चर्चांच्या निमित्ताने एक विषय मात्र डोक्यात आला. तो म्हणजे, राजकिय नेते हे समाजतल्या मानसिकतेचे चेहरे असतात. कोणाला कोणता नेता आणि विचार आवडावेत अथवा आवडू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण अनेक वैयक्तिक एकत्र येऊन समाज बनतो आणि विचारधारांचा अभ्यास होण्या ऐवजी दुसर्‍याचे उणेपण दाखवणे जास्त होते. राजकारणावर चर्चा करणे ठिक आहे. पण आपल्याला खरच या राजकिय नेत्यांसारखे बनणे जमणार आहे का? हा एक विचार आहे. कोणामध्ये इतकी हिंमत आहे की जाऊन आजचे राजकिय वैचारिक चित्र बदलता येणार आहे? कोण हरीचा लाल आहे जो म्हणतो आज भारतात सर्व छान चालले आहे अथवा सुरळीत चालले आहे?

घरापासून ते राष्ट्राच्या सर्वोच्च पदाच्या निवडी पर्यंत जो विरोध असतो तोचमुळी वैचारिक असतो. खास करून राष्ट्राचा जेंव्हा विचार असतो तेंव्हा राष्ट्राचे हित, विकास हेच सर्वांचे ध्येय असते. पण विचार प्रवाह मात्र वेगळे असतात. कोणाला कोणत्या विचार प्रवाहात सामील व्हायचे आहे तो वैयक्तिक विचारांचा भाग आहे. त्यासाठी आपण आपल्या विचारांचे समर्थन करणे योग्य. दुसर्‍याचे मुद्दे चुकीचेच आहेत असे मोठ्याने ओरडून आपले मुद्देच बरोबर आहेत असे नक्कीच सिद्ध होत नाही.

वर म्हटल्या प्रमाणे हे असे विषय अंतहिन आहेत. त्यापेक्षा या राजकिय नेत्यांच्या यशापयशाचा विचार केल्यास आपल्याला अनेक नवे अथवा अभ्यासपूर्ण मुद्दे मिळतील. खाली एक छोटी यादी देतो आहे. त्यातले काही नेते अलिकडचे आहेत. पण त्यांच्या राजकिय विचारांचा प्रभाव बराच परिणाम कारक आहेत. एखाद्या नेत्या बद्दल लिहिताना आपण थोडा अभ्यास करू आणि मगच लिहू. उगाच वैयक्तिक आकसापोटी नको.

  1. गांधीजी – जगातल्या काही महान नेत्यां पैकी एक. त्यांचे कोणते विचार असे होते ज्यामुळे काही जणांना विकृत म्हणवले जात आहे? येथे गांधीजी कसे महान होते अथवा नव्हते हा मुद्दा अपेक्षीत नाहीये. पण त्यांची हत्या/वध झाली/झाला हे सत्य आहे. आज सुद्धा त्यांच्या आडनावाचा करिश्मा आहे हे सुद्धा सत्य आहे.
  2. सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी – या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते. या त्यांच्या वैचारिक अपयशा बद्दल कोणते मुद्दे महत्वाचे आहेत?
  3. हिटलर – चर्चिल – हे दोन आणि असे काही नेत त्या काळातले जगातले सर्व प्रकारचे राजकारण ढवळून काढणारे आहेत. लोकांवर त्यांचा एवढा का प्रभाव होता? लोकांना युद्धात ढकलणारा हिटलर आणि शतकानूशतके जगातल्या अनेक राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची हत्या करणारे ब्रिटिश. यांच्यामध्ये महान कोण? अथवा जास्त विकृत कोण? फक्त रक्तपात न होणे हेच काय ते महानतेचे प्रतिक आहे काय? असे असेल तर महाकाव्यांमधले युद्ध आपण आवडीने का ऐकत आलो आहोत? ते सुद्धा विकृतच नाही का?
  4. नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका यांच्या मध्ये असे कोणते नेतृत्व गुण आहेत जे अनेक दशके भारतीयांना लोकशाहीचे संरक्षक म्हणून योग्य वाट आले आहेत? पर्यायी नेतृत्व शक्यच नव्हते की जनतेला दुसरे कोणी नकोच आहे की इतरांमध्ये तेवढी कुवतच नाही? या लोकांच्या यशाचे नेमके कारण काय असावे?
  5. लालू, मायावती, मुलायम, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे इत्यादी नेते काही जणांना प्रचंड विकृत वाटत आले आहेत आणि राजकारणात यश अपयश यांनी चाखले आहे. त्यांच्या या यशापयशाचे कारण काय असावे?

राजकिय नेत्यांची बाजू घेताना आपल्याला खरच त्यांची सर्व मते पटली आहेत का? हे कितपत महत्वाचे आहे? एखादी व्यक्ति मग ती राजकिय असली तरी त्यांचे सगळेच गुण आपल्याला आवडायला हवे आहेत का? की त्यांच्यामधले आपल्याला आवडणारे/पटणारे मुद्दे/गुण आपण घ्यावेत आणि बाकिच्यांबद्दल वाद न घालता आपण त्यांच्या विचारांना सुद्धा मान द्यावा? तुम्हाला काय वाटते?

तसा राहिलो नाही!!

सोबती आता कशाला? तसा राहिलो नाही!!
आरती आता कशाला? तसा राहिलो नाही!!

थकलो जरा,  मग मी असा  थांबुन पाही,
थांबला तुम्ही कशाला? तसा राहिलो नाही!!

ऐकले तुम्ही कुणाला? जरी बोललो नाही,
भोवती येता कशाला? तसा राहिलो नाही!!

भावला मृत्यू मनाला!! तसा जगलो नाही,
गाळता अश्रु कशाला? तसा राहिलो नाही!!

थांबवा आता स्वतःला!! तसा राहिलो नाही,
गोठवा आता मनाला!! तसा राहिलो नाही!!

गेले ते गेले!!

तेल गेले, तूप गेले!!
वाढले वय, रूप गेले!!

काय बाकी वा कशाला
जायचे ते खूप गेले!!

लोकशाही पण मिळाली
विसरले मग नृप गेले!!

एक तू होतास वाल्या
राम म्हणुनी पाप गेले!!

भीम आहे देव आता
बुद्ध गाडुनी स्तूप गेले!!

माझाच मी

गाव माझाच मी सोडणार आहे,
ठाव माझाच मी शोधणार आहे!!

गुंफिला प्रीतीचा गोफ तो जरी,
पाश माझेच मी तोडणार आहे!!

शत्रु नव्हतो कधी ही तुझा मी,
दंड मात्र मीच आज भोगणार आहे!!

मृत्यु नसतो प्रीतीला कदापी,
प्रेत माझेच मी जाळणार आहे!!

घाव घाला रे कुठे ही कोणी ही,
वेदना हा चाणक्य सोसणार आहे!!

मी असा कसा ?

रोजचा दिवस ढकलतो मी असा कसा?
रोजचा कड्यावरून मला ढकलतो मी असा कसा ?

नित्य नवे स्व्प्न जरी मी पाहतो,
रोज ध्येय माझेच बदलतो मी असा कसा ?

प्रेम खरे जरी मी शोधतो,
रोज प्रेयसी माझीच विसरतो मी असा कसा ?

पदरी आहे जरी निराशा,
रोज आशा माझीच खुलवतो मी असा कसा ?

वाहतात श्रद्धांजली (मला) का?
रोज प्रेत माझेच जाळतो मी असा कसा?

चाणक्य आहे जनता ही भोळी
रोज निती माझीच शिकवतो मी असा कसा?

कधीचच सोडलंय

आताशा मी चिडणं कधीचच सोडलंय
आताशा मी रडणं कधीचच सोडलंय
आयुष्यात कोणाचं कोणा वाचून कुठे काय अडलंय?
म्हणूनच मी आता माझं मला वाऱ्यावर सोडलंय…

अनय

अनय, हे नाव काहिंना माहित असेल तर काहिंना अजिबातच माहित नसेल. मला सुद्धा फार काही माहित नाही. मला एवढच माहित आहे कि अनय हा राधेचा पती. आता राधा कोण? असे मात्र फार कमी लोक विचारतील. पण राधा अनय बद्दल बोलतानाच “राधा कोण?” या प्रश्नाचे जे उत्तर मिळते तेच अनेक प्रश्न पुन्हा उभे करून जाते. तर, परत तो प्रश्न आलाच. राधा कोण? राधा हि कृष्णाची राधा. आता जिथे आपण अनयला राधाचा पती म्हणतो तिथेच राधा कृष्णाची म्हणतो? याला काय म्हणावे? प्रेमाची नाती? नात्यांची चेष्टा की प्रेमाची चेष्टा? नक्कि काय?
अनयचं नाव आलं की माझ्या मनात हे असे प्रश्न येतात आणि ते नेहमीच अनुत्तरीत राहतात. आजुबाजूला पाहिलं तर मला अनेक अनय दिसतात. एक काळ होता जेंव्हा प्रेमविवाह म्हणजे एक धाडस असायचं. आता आजच्या जगात प्रत्येकजण प्रेम करतो. कदाचित काहिजण अव्यक्त, काहि जण यशस्वी आणि काहिजण अयशस्वी तर काहि जण लग्ना नंतर आपल्या पती/पत्नीवर. जे पती पत्नी एकमेकांवर लग्नानंतर प्रेम करतात, प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ देतात ते खरच नशीबंवान. पण जे अनय आहेत त्यांच काय? आता त्यांच्या पत्नीच पहिल प्रेम त्यांच्यावर नसेल तर त्यांचा काय दोष? कदाचित त्या राधांचं पहिल प्रेम कोणा व्यक्तिवर असेल, त्यांच्या स्वप्नावर असेल वा त्यांन्या स्वप्नांच्या गावी नेणार्‍या त्यांच्या स्वप्नातल्या जोडीदारावर असेल. खरा जोडीदार त्यांना ते कधीच देउ शकणार नाही जे त्यांना हवं होत. त्या अनयशी लग्न करतात. पण त्याला आपला प्रियकर नाही बनवू शकत. तो असतो फक्त एक पती. त्यांच्यावर प्रेम करणारा. पण आपण एक स्वीकृत पती आहोत, निवडक नाही या दुय्यम भावनेन जगणारा.
राधेच लग्न अनयशी झालं खरं. समाज मात्र म्हणताना राधा-शाम म्हणतो. आज सुद्धा अनेक राधा आपला शाम आठवत राहतात आणि अनयशी नातं जोडतात. पण या अनयला मात्र राधा आपल्यावर प्रेम करते हे समजावचं लागत कारण समाजाला या नात्यांमध्ये त्या अनयची राधा दिसत नाही की सत्यातल्या राधेचा शाम मान्य होत नाही. जे काही खर आहे ते त्या अनयला माहित आणि आजच्या अनयला माहित. आज सुद्धा अनय मात्र तोच आहे. दुय्यम, एक राधा स्वीकृत, समाज स्वीकृत, राधेचा पती…..

जन पळभर

जन पळ भर म्हणतील हाय हाय!
मी जाता राहील कार्य काय?

किती सरळ, सोपी परंतु मनाला भिडणारी आणि आयुष्याचे सत्य सांगणारी ही कविता आहे ना? शाळेत जेव्हा शिकलो तेव्हा तर धड कळली सुद्धा नव्हती. फक्त कवितेच्या चालीमुळे लक्षात राहिली होती. पण म्हणतात ना एखादी गोष्ट मनात घर करून राहते. थोडी फार तशीच ही कविता मनातच घर करून राहिली आहे. मला नेहमीच हा प्रश्न पडत आला आहे की जेव्हा आयुष्य म्हणजे काय? हे सुद्धा माहीत झालेलं नसतं तेव्हा या असल्या कविता शिकवल्याच का? शाळेत मराठीचा अभ्यास न आवडण्याचे हे तर एक कारण नसेल? असो, सांगायचा मुद्दा हा की मृत्यूची आणि माझी ओळख या कवितेने झाली म्हणायला काही हरकत नाही. एखादी गोष्ट उदाहरणा शिवाय समजणे कठिणच तसे, मग आता मृत्यू म्हणजे काय हे कसे समजणार? अन याच उत्तर लहानपणी लहान मुलाला कोण देणार? पण यामुळे प्रश्न मनात तसाच राहून गेला.

जेव्हा होते ते आजोबा वारले तेव्हा काही जास्त जाणवलं नाही अन वय पण तसं लहानच होत. पण झालेला सगळा प्रकार पाहून चक्रावायला झालं होतं. कधी न पाहिलेली माणसं पाहिली होती. त्यामुळे गूढ जास्तच वाढलं होतं. या सुमारास मी मावशीकडे जायचे शिकवणीला. मावसं भाऊ तर फारच लहान होता. त्याला सुद्धा एक आजोबा होते. ते आजारी, एकाकी असायचे. पलंगावरून फक्त जेवण अन अशाच गरजेच्या वेळेला उठायचे. तेही आजींच्या सोबतीने. त्या आजी मात्र मला का कोणास ठाऊक मला माझ्या आजी वाटायच्या. अन त्यामुळे नकळत ते आजोबा मला माझे वाटत होते. मी त्यांच्याशी कधीच बोललो नाही. त्यांना कधीच आजींशिवाय कोणाशी बोलताना मी पाहिलं नव्हत. फक्त ऐकला होत की ते संस्कृतचे हाडाचे शिक्षक होते. आजोबा फारच थकलेले होते. त्यांचा सकाळचा दिनक्रम न्याहाळणे हे मला नित्याचे झाले होते. अभ्यास इयत्ता वाढत गेल्या, अर्धी चड्डी जाऊन पॅन्ट आली होती अन मिसरूड सुद्धा फुटली होती मला. सभोवतालचे वातावरण फारच न्यारे होते. पौगंडावस्था म्हणतात ना ते. मन बेभान असायचं. एक दिवस ते आजोबा गेल्याचे कळलं. मनात एक वेगळाच गोंधळ उडाला. काय करावं सुचेना. सगळे मावशीकडे गेले तसा मी पण गेलो. मृत पार्थिवावर करायचे सोपस्कार करणं सुरू होत. जे शव आहे ते आजोबांच आहे ते पटत नव्हत. उद्या सकाळी आजोबा आपल्याला दिसणार नाहीत या विचारानं कसकसं झालं. नकळत माझा खांदा यावेळी वापरला गेला. नदी घाटी शवाने पेट घेतला. नदीकाठचा शांत परिसर, लोकांची कुजबूज आणि ते पेटलेले शव पाहून नकळत मनात आलं.

गंगेच्या घाटावर एक प्रेत जळताना मी पाहिलं होतं
खरंच उद्या माझं सुद्धा प्रेत असंच जळणार होतं.

मी त्या घाटावरच माझ्या मृत्यूला स्वीकारलं होत. आता खरंच काही वाटत नाही. अनेकांना मृत्यूच्या विचारांनी घाबरायला होतं. कदाचित त्या जळणार्‍या प्रेताने मला सत्य समजावलं होतं. मृत्यू इतकं चांगलं काही असू शकत? हां!!! आता मृत्यू येतो कसा? किती शरीराला किती त्रास देतो. मरणार्‍यांच्या नातलगांना किती त्रास होतो हाच काय तो फरक. कधी कधी अंथरुणाला खिळलेला माणूस अन त्याची माणसं मनात म्हणतात हा सुटला तर बरं होईल, त्याची सुद्धा सुटका होईल अन आमची पण. मरण अनेक प्रश्न सोडवत काही उभे करतं. जे स्वयंसिद्ध आहेत त्याचं कुठं काय अडणार आहे कोणी गेल्याने. शेवटी काय? मला काय आणि किती फरक पडतो हाच प्रत्येकाचा प्रश्न असतो. तो मग मनात असो वा जनात.

मला मात्र आता मृत्युचं आकर्षण वाटायला लागलंय. हा हा.. घाबरू नका. मी आत्महत्या नाही करणार. मला मृत्यूमध्ये एक आनंद दिसतोय. एक पूर्णत्व. कदाचित कोणाला तरी मी नसल्याच दु:ख वाटेल. पण खरंच त्याचं काही अडणार आहे माझ्या शिवाय? मला विचाराल तर नाही अडणार. म्हणूनच मी तयार आहे जेव्हा येईल त्यावेळी माझ्या मृत्यूला स्वीकारायला… खरं आहे. त्या कवितेचा अर्थ शाळेत नाही कळला. पण आज मला पटला आणि आवडला….

जन पळ भर म्हणतील हाय हाय!
मी जाता राहील कार्य काय?