राजकिय विचार – विकृती की आपली आवड?

नमस्कार मंडळी,

हिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात? या चर्चेमध्ये बरेच प्रतिसाद आले. वाद प्रतिवाद झाले. मुळात आवड-निवड सापेक्ष असल्याने या आणि अशा विषयांना अंत नाही. या चर्चांच्या निमित्ताने एक विषय मात्र डोक्यात आला. तो म्हणजे, राजकिय नेते हे समाजतल्या मानसिकतेचे चेहरे असतात. कोणाला कोणता नेता आणि विचार आवडावेत अथवा आवडू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण अनेक वैयक्तिक एकत्र येऊन समाज बनतो आणि विचारधारांचा अभ्यास होण्या ऐवजी दुसर्‍याचे उणेपण दाखवणे जास्त होते. राजकारणावर चर्चा करणे ठिक आहे. पण आपल्याला खरच या राजकिय नेत्यांसारखे बनणे जमणार आहे का? हा एक विचार आहे. कोणामध्ये इतकी हिंमत आहे की जाऊन आजचे राजकिय वैचारिक चित्र बदलता येणार आहे? कोण हरीचा लाल आहे जो म्हणतो आज भारतात सर्व छान चालले आहे अथवा सुरळीत चालले आहे?

घरापासून ते राष्ट्राच्या सर्वोच्च पदाच्या निवडी पर्यंत जो विरोध असतो तोचमुळी वैचारिक असतो. खास करून राष्ट्राचा जेंव्हा विचार असतो तेंव्हा राष्ट्राचे हित, विकास हेच सर्वांचे ध्येय असते. पण विचार प्रवाह मात्र वेगळे असतात. कोणाला कोणत्या विचार प्रवाहात सामील व्हायचे आहे तो वैयक्तिक विचारांचा भाग आहे. त्यासाठी आपण आपल्या विचारांचे समर्थन करणे योग्य. दुसर्‍याचे मुद्दे चुकीचेच आहेत असे मोठ्याने ओरडून आपले मुद्देच बरोबर आहेत असे नक्कीच सिद्ध होत नाही.

वर म्हटल्या प्रमाणे हे असे विषय अंतहिन आहेत. त्यापेक्षा या राजकिय नेत्यांच्या यशापयशाचा विचार केल्यास आपल्याला अनेक नवे अथवा अभ्यासपूर्ण मुद्दे मिळतील. खाली एक छोटी यादी देतो आहे. त्यातले काही नेते अलिकडचे आहेत. पण त्यांच्या राजकिय विचारांचा प्रभाव बराच परिणाम कारक आहेत. एखाद्या नेत्या बद्दल लिहिताना आपण थोडा अभ्यास करू आणि मगच लिहू. उगाच वैयक्तिक आकसापोटी नको.

  1. गांधीजी – जगातल्या काही महान नेत्यां पैकी एक. त्यांचे कोणते विचार असे होते ज्यामुळे काही जणांना विकृत म्हणवले जात आहे? येथे गांधीजी कसे महान होते अथवा नव्हते हा मुद्दा अपेक्षीत नाहीये. पण त्यांची हत्या/वध झाली/झाला हे सत्य आहे. आज सुद्धा त्यांच्या आडनावाचा करिश्मा आहे हे सुद्धा सत्य आहे.
  2. सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी – या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते. या त्यांच्या वैचारिक अपयशा बद्दल कोणते मुद्दे महत्वाचे आहेत?
  3. हिटलर – चर्चिल – हे दोन आणि असे काही नेत त्या काळातले जगातले सर्व प्रकारचे राजकारण ढवळून काढणारे आहेत. लोकांवर त्यांचा एवढा का प्रभाव होता? लोकांना युद्धात ढकलणारा हिटलर आणि शतकानूशतके जगातल्या अनेक राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची हत्या करणारे ब्रिटिश. यांच्यामध्ये महान कोण? अथवा जास्त विकृत कोण? फक्त रक्तपात न होणे हेच काय ते महानतेचे प्रतिक आहे काय? असे असेल तर महाकाव्यांमधले युद्ध आपण आवडीने का ऐकत आलो आहोत? ते सुद्धा विकृतच नाही का?
  4. नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका यांच्या मध्ये असे कोणते नेतृत्व गुण आहेत जे अनेक दशके भारतीयांना लोकशाहीचे संरक्षक म्हणून योग्य वाट आले आहेत? पर्यायी नेतृत्व शक्यच नव्हते की जनतेला दुसरे कोणी नकोच आहे की इतरांमध्ये तेवढी कुवतच नाही? या लोकांच्या यशाचे नेमके कारण काय असावे?
  5. लालू, मायावती, मुलायम, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे इत्यादी नेते काही जणांना प्रचंड विकृत वाटत आले आहेत आणि राजकारणात यश अपयश यांनी चाखले आहे. त्यांच्या या यशापयशाचे कारण काय असावे?

राजकिय नेत्यांची बाजू घेताना आपल्याला खरच त्यांची सर्व मते पटली आहेत का? हे कितपत महत्वाचे आहे? एखादी व्यक्ति मग ती राजकिय असली तरी त्यांचे सगळेच गुण आपल्याला आवडायला हवे आहेत का? की त्यांच्यामधले आपल्याला आवडणारे/पटणारे मुद्दे/गुण आपण घ्यावेत आणि बाकिच्यांबद्दल वाद न घालता आपण त्यांच्या विचारांना सुद्धा मान द्यावा? तुम्हाला काय वाटते?

सामाजिक जबाबदारी – प्रसिद्धी माध्यमे आणि आपण

उपक्रम या संकेतस्थळावर मी हि चर्चा सुरु केली होती. संपुर्ण चर्चा आणि उपक्रमींचे प्रतिसाद येथे पाहता येतील. आपण आपली मते येथे सुद्धा व्यक्त करु शकता…

बाँब स्फोट, गोळीबार, हल्ला हे हल्लीचे सर्वात जास्त वाचले जाणारे, ऐकले जाणारे शब्द आहेत. वाचेल् जातात वृत्तपत्रात, महाजालावर आणि ऐकले जातात दृकश्राव्य माध्यमांवर. जे वाचले जाते आणि पाहिले जाते त्याने समाज मनावर खुप खोलवर परिणाम होतात. ब्रेकिंग न्युज देणे हे आद्य कर्तव्य असणार्‍या प्रत्रकाराला/वार्ताहाराला आपण आपले कर्तव्य चोख पार पाडतो आहोत असेच वाटणे सहाजिक आहे. पण ते करत असताना आपण नक्की काय करतो आहोत. त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केला जातो?
तंत्रज्ञानच्या सोबतीने आज अनेक वृत्त वाहिन्या आहेत. वाहिनीचा कॅमेरामन नसेल तर मोबाईलवर ऑखोदेखा हाल देणे सुरु असतेच. एखादी बातमी घातक प्रतिक्रियांची साखळी बनवू शकते हे त्यांना कळत नाही का? हल्ली हेच विचार प्रत्येकाच्या मनात असतील. जे घडते आहे ते पहायला मिळत असल्याने या वाहिन्या पाहण्याचा मोह सुद्धा टाळला जात नाही. मन अस्वस्थ होऊन जाते. त्यात आणखी भर म्हणून मग घडलेल्या घटनेवर राजकिय नेत्यांच्या प्रतिक्रिया. प्रसिद्धी माध्यमाचा वापर स्टंटगिरी करण्यासाठी होतो. या सर्वांमध्ये सामान्य माणसाचे विचार अक्षरशः गुदमरुन जातात. तुम्हाला काय वाटते?

1. आजच्या घडीला प्रसार-प्रसिद्धी माध्यमांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता?
2. एखाद्या गोष्टीचे वार्तांकन करणे ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे असे आपल्याला वाटत नाही का?
3. जे अनिवासी भारतीय आहेत त्यांचा भारता बाहेर काय अनुभव आहे?
4. हे प्रभावी माध्यम आहे हे आपण जाणतो. आजच्या घडीला आपण त्याचा कसा वापर करु शकतो?

असे अनेक मुद्दे आहेत जे आपल्याला येथे मांडता येतील. या चर्चेच्या निमित्ताने आपण ते येथे जरूर मांडावेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वृत्तपत्रांनी खुप महत्वाची आणि मोठी भुमिका निभावली आहे. हे प्रभावी माध्यम आहेच. ज्या काळात साक्षरता कमी होती त्यावेळचा या माध्यमाचा प्रभाव आपण वाचला आहे तर काहींनी अनुभवला आहे. आजच्या भारताला देखील या प्रभावी माध्यमाचा जबाबदारीने वापर करायचा आहे. लोकशिक्षणासाठी, देशप्रेमाचे. सेवेचे धडे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी. मित्रहो, आपण येथे लिहितो, वाचतो. महाजाल हे सुद्धा प्रभावी माध्यम आहेच. पण भारतात आज सुद्धा ते तळागाळा पर्यंत गेलेले नाही. भारतात आज सुद्धा वर्तमान पत्र जास्त प्रभावी आहे. आपण आपले विचार येथे जरुर मांडावेत. महाजालावर अनेक वृतपत्र संपादक/वार्ताहर वावरत आहेत. त्यांनी सुद्धा अशा उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. तर घ्या लेखणी/कळफलक आणि आपले विचार येथे मांडा. असे विचार मंथन करायचा हा पहिलाच आणि पण थोडा विस्कळीत प्रयत्न आहे. अनुभवानुसार त्यात बदल केले जातीलच. पण कुठेतरी सुरुवात व्हायला हवी. चला तर मग…



पुरोगामी कोल्हापूर आणि बेगडी धर्मांधता

गेले काही दिवस/आठवडे/महिने कोल्हापूरातला विश्वशांती यज्ञ गाजतो आहे. गाजायला तशी वेगवेगळी कारणे आहेत. कोल्हापूरचा पुरोगामीपणा दाखवण्यात तेथील राजकारणी एकदम सरसावले आहेत. नाण्याचा दोन्ही बाजूंप्रमाणे यज्ञ विरोधक आणि समर्थक आपापल्या मुद्यांसह पुढे येत आहेत. उपक्रम सारख्या संकेतस्थळांवर यावर चर्चा सुद्धा झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व पातळीवर विरोध करुन सुद्धा हा यज्ञ पार पडतो आहे. असा हा यज्ञ होणे हा काही प्रमाणात लोकशाहीचा विजय मानला पाहिजे. कधी नव्हे ते हिंदू धर्मातल्या काही गोष्टींना विरोध करणे याला कोल्हापूरात पुरोगामीपणा मानले जाते त्या कोल्हापूरात विरोध होऊन सुद्धा हा यज्ञ पार पडतो आहे. अनेकांनी मुद्दे मांडले. त्यातला सर्वात चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे अन्न पदार्थांची नासाडी. मी सुद्धा या कारणासाठी आक्षेप नोंदवेन. पण विरोध नाही. नासाडी न करता काही करता येत असेल तर जरुर करा.

कोल्हापूरात या गोष्टीचा कर्मकांडाचे स्तोम असा प्रचार सुरु आहे. जो आम्ही वृत्तपत्रातुन वाचतो आहे. पण स्वतःला पुरोगामी म्हणणारे हे विरोधक पुरोगामी नाहीत तर खर्‍या अर्थाने धर्मांध आहेत असे मी तरी म्हणेन.  आपल्या भारतात धर्मवेड्या लोकांचा धर्मांध म्हटले जाते. पण धार्मिक गोष्टींना, फक्त राजकिय स्वार्थासाठी विरोध करणे अथवा फक्त एका धर्माची मते मिळवण्यासाठी त्यांची भलामण करणे या सर्वस्वी आंधळ्या कृत्ये करणार्‍यांना मी धर्मांध म्हणेन. कोणत्याही धर्माच्या एखाद्या गोष्टीचा राजकिय हेतुसाठी विरोध अथवा समर्थन याला मी धर्मांधता म्हणेन.

आता जर हा विरोध नासाडीसाठी होतो आहे तर सरते शेवटी हि अन्नाची म्हणजेच पैस्याची नासाडी झाली. मग ती काही लोकांच्या समाधानासाठी आहे तरी सुद्धा. पण हे मान्य करताना, मुठभर लोकांच्या धार्मिक यात्रेसाठी कोट्यावधी रुपयांची नासाडी कशी चालते? हा कोट्यावधीचा निधी विकास कामांसाठी नक्कीच वापरता येऊ शकतो. तसेच लोकशाहीमध्ये इतर कोणत्या धर्मासाठी अशी तरतुद सुद्धा दिसत नाही. मग हे असे करणे ही सुद्धा धर्मांधता नाही का? आणि जर हे मुद्दे हिंदू नेत्यांनी काढले तर ही धर्मांधता कशी?

थोडक्यात काय? स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणर्‍या कोल्हापुरातल्या (कोल्हापूर – गाव तसं चांगल पण वेशीला टांगल!!) नेत्यांना यज्ञाची कृत्ये धर्मांध वाटतात. पण कोल्हपूरच्या विकासाचे आणि अनेक अनुत्तरीत प्रश्न मात्र बोलावेसे वाटत नाहीत. त्यांची हि कृत्ये लोकशाही धर्माविरुद्ध नाहीत का? मी तर याच लोकांना सर्वप्रकारे धर्मांध म्हणेन….



मी आणि ओबामा

काल पासुन जिकडे पहावे तिकडे फक्त ओबामा हे एकमेव नाव दिसते आहे. ओसामा विरुद्द सुरु केलेली लढाई बुश अप्रक्षरित्या ओबामा सोबत हरला. असो. आता जे शीर्षक आहे “मी आणि ओबामा” या बद्दल.  मित्र हो, एखादा माणूस प्रसिद्ध झाला की प्रत्येकजण त्याच्याशीआपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध लावून मी पण त्याच गोत्यातल्या हे ठसवायचा प्रयत्न करतो. मी काहीसे तसेच करणार आहे. :) . घाबरू नका, वैतागु नका. मला ओबामांचे कौतुक वाटते म्हणूनच माझा आणि त्यांचा संबंध. बाकी काही एक नाही.
- “खरतर अमेरिकेतल्या मराठी लोकांच्या तिथल्या राजकिय ज्ञानासमोर माझे ज्ञान म्हणजे समुद्रातला एक थेंब. अमेरिकेत दर चार वर्षांनी अधक्षपदाच्या निवडणुका होतात आणि अमेरिका ही जगातली महासत्ता असल्याने सर्व जगाचे त्या निवडणुकांकडे लक्ष आहे. हे आमचे ज्ञान. तसेच  महासत्ता म्हणून मिरवणारे लोकं बुश सारख्या माणसाला निवडून देतात. त्यामुळे त्यांच्या राजकिय बुद्धी बद्दल काय तर्क करायचे याचे देखील आम्हाला कोडे पडते. असो, मला ओबामाचे कौतुक वाटते म्हणजे त्याने अमेरिकनांना आणि अप्रत्यक्षरित्या जगाला संदेश दिलायेस!! वुई कॅन!!” अर्थातच आम्ही ठरवलं तर नक्कीच करु शकतो.

राजकारण सगळीकडे जवळपास एक सारखंच. तरुण पिढीचे या बद्दलचे मत म्हणजे, या बद्दल काही एक केले जाऊ शकत नाही. सम्स्त मानवजातीला निराशेच्या गर्तेत फेकायाची शक्ति असलेल्या लोकांचा एक पाशवी खेळ. आमचे असे काहीसे मत गेल्या दशक भरात झाले होते. वर्ण, धर्म आणि जात यांचा आधार घेत विकासाचे मुद्दे कसे बाजूला ढकलता येतात याचे मुर्तीमंत उदाहरण द्यायचे झाले तर लोकं भारताकडे नक्कीच बोट दाखवतील. तर, अशा या राजकिय नैराश्याने ग्रासलेल्या भारताचे आम्ही नागरीक, ज्यांच्या रोजच्या रोजी रोटीचाकाही भाग अमेरिकेवर अवलंबुन होऊ लागला आहे, अशा आमचे डोळे या निवडणुकांच्या निकालाकडे लागले होते.
ओबामांनी योग्य मुद्दे योग्य प्रकारे मांडून विजय मिळवला आहे. हो!! आम्ही बदल घडवू शकतो हा विश्वास सम्स्त जगताला दिला आहे. बाकी अमेरिके संदर्भातले निर्णय ओबामा घेतीलच. पण त्याच सोबत माझ्या सारख्या असंख्य तरुणांना, तुम्ही बदल घडवून आणू शकता हाविश्वास दिला आहे.
माझ्यात हा विश्वास ओबामानी ओतला आहे आणि म्हणूनच माझे आणि ओबामाचे असे काहीसे नाते आहे. आता येणार्‍या काही महिन्यात भारतात लोकसभेच्या निवडणुका आहेत. काही चमत्कार नक्कीच घडणार नाहीत. राजकिय पक्षांनी योग्य प्रकार वातावरण निर्मिती सुरुकेली आहे. या वातावरणात खरतर भारताला एका ओबामाची गरज आहे. तो कदाचित माझ्यात आहे, तुमच्यात आहे. कदाचित या निवडणुकीत एका ओबामाचा जन्म होणार आहे. अन येत्या दशकात भारताला धर्म/जात/भाषा यांच्या तंट्यातुन बाहेर काढून एका परिपक्व राष्ट्रात नेणारआहे. आशा करुयात की उद्याच्या भारतात आपण सुद्धा एक ओबामा पाहूया. आपण सुद्धा ओबामा बनुया. कारण अशक्य असं काहीच नाही. ओबामा स्वतःच म्हटले आहेत – “येस! वुई कॅन!!”

वंशज

हिंदुंच्या नेत्यांना येथे
नाझीचे वंशज मानतात
कॉंग्रेसच्या शासनात मात्र
मुसोलीनीचे वंशज चालतात

भारतीय मतदार

आपल्याकडे ग्रामपंचायती पासून लोकसभे पर्यंत कोणत्याही निवडणुका आल्या कि शब्दांचे खेळ सुरु होतात. मतदाराचा लगेच मतदार राजा होतो. जगभरात थोड्याफार फरकाने सगळीकडे हिच परिस्थिती असावी असे वाटते. (वेगळी असू शकते.) पण आपल्याकडे जरा खासियत असते. भारतीय मतदार जरा हटकेच आहेत हे मात्र खरे.

भारतात निवडणुक कशासाठी होते आणि कोणासाठी होते हा एक मोठा अभ्यासाचा प्रश्नच आहे. मतदान कोणत्या कारणासाठी होते कोण करते हे सगळेच एकदम अभ्यासाचे मुद्दे आहेत. निवडणुका ग्रामपंचायतीच्या असतात, साखर कारखान्यांच्या, दुधसंघांच्या…….. विधानसभेच्या आणि लोकसभेच्या. निवडणुका होतात पण वर्षानुवर्ष त्याच त्याच मुद्यांवर होतात. मतदारांची मानसिकता फारशी बदलेली नाही. खरतर मतदान हा शब्दच कसा आहे ना? मत आपलं असत. ते आपण देणार असतो. खास करून अशा माणसाला जो समाजासाठी काही ना काही कार्य करणार असतो. आपण स्वतः सुद्धा समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत. त्यामुळे मतदान हा आपला स्वार्थ आहे. आपण मत देतो ते एका मोबदल्यासाठी. मग ते दान कसे?

आपल्याकडे १३ दिवसात सरकार पडले, परत निवडणुका झाल्या. पण सरकार पडायचे कारण काय? कांद्याचा भाव. ठिक आहे. मान्य आहे. पण त्यानंतर आजवर अनेकदा अनेक भाव अतर्क्य वाढले. पण आता सरकारे नाहीत पडत. एक बाजु मान्य करू कि हा राजकारणाचा भाग आहे. पण एकदा कांद्याच्या भावासाठी मतदान करणारा मतदार अणूकराराच्या मुद्यासाठी इतका निराश? अस का व्हावं बर? मुळातच मतदान करणारे मतदार कोण? हाच कळीचा मुद्दा आहे. आपल्याकडे कधीतरीच भरभरुन मतदान होते. जेंव्हा भारतात मतदान ८०% वगैरे होईल त्यावेळी भारतात नक्किच काहितरी जोरदार घडले असणार आहे. कारण एकदम सरळ आहे. सर्वसामान्य, प्रत्येक भारतीय मतदार सर्वात पहिले म्हणजे उजडेचमन असतो. माझ्या एकट्याच्या मताने काय फरक पडणार आहे? शेवटी राजकारण हा घाणेरडा खेळ आहे, आम्हाला त्याचा भाग व्हायचे नाही. आम्ही मतदान करू, पण बोगस मतदान कोण थांबवणार वगैरे वगैरे सगळे मुद्दे मतदान न करण्यासाठी नेहमीच पुढे येतात. मग मतदान होते ते कोणाचे? ज्यांना रोजच्या रोटीचा प्रश्न आहे. ज्यांना कर भरायचाच नाही. ज्यांना कधी स्वतःचे पक्के मोठे घर बांधायचेच नाही. ज्यांना अनधिकृत गोष्टी अधिकृत करुन घ्यायच्या आहेत. हे असे मतदार मग नेटाने मतदान करतात कारण त्यांना समाजाच्या उद्याची चिंता नसते कि त्यांच्या पुढच्या काही वर्षांची.

सरकारे बनतात, पडतात, तुम्ही आम्ही त्यांच्या कायद्याच्या चौकटीत राहुन आयुष्य जगतो, रेशन कार्डावर सामान आणायला आपण जातच नाही. आतातर ते आपल्याला मिळत देखील नाही. मग त्यावर मिळणारे धान्य काय प्रतिचे आहे? हे कशाला पहायला जातोय? पण सरकार मात्र आम आदमीचा नारा देउन नवीन चित्रे रंगवुन घोटाळे करतात. कर आपण भरतो, पण खिसे कर न भरणार्यांचे भरतात. काहिजणांचे निवडणुक उभी होइ पर्यंत तर काहिंचे ऐन निवडणुकीच्या दिवसात. आपण मात्र आहोतच फॉर्म १६ भरायला तत्पर. नाहीतर सरकारचे प्रेमपत्र आहेच कधी ना कधी.

असे कित्येक मुद्दे आहेत जिथे आपण सगळेच भरडले जात असतो. मग मुद्दा कांद्याचा-डाळीच्या भावाचा असो, कि शस्त्रास्त्र खरेदिचा. आपण उदास, पण याचे जे दुरगामी परिणाम घडतात, त्याला जबाबदार कोण? आपणच आहोत. जरा डोळे उघडून बाहेर पहायला हवं. जगात अनेक देशात जागरुक मतदार आहेत. भरलेल्या कराचा मोबदला मिळालाच पाहिजे या भावनेने विचार करुन मतदान करणारे मतदार आहेत. जगात आपला देश एक जबाबदार देश आहे आणि आपल्या सरकारच्या निर्णयाचे जगावर चांगले वाईट परिणाम होणार आहेत याचा विचार करुन मतदान करणारे मतदार आहेत. मग भारतीय मतदार असे का? एवढे उदास, एवढे कमविचारी? कि आम्ही असेच आहोत? आम्हाला सगळंच जे घडत ते मान्य आहे? आम्हाला आमचं आमचं राज्य करायची इच्छा नाही? कि आमच्यावर लादलेलेच राज्य जास्त चांगल असत? छातीठोक पणे सांगायच कि भारतातली लोकशाही हि जगातली सर्वात मोठी आणि प्रगल्भ लोकशाही आहे. मात्र हे सांगताना मतदान करणारे मतदार खरच प्रगल्भ आहेत? भारतात मतदारांनी खरच आपला हक्क म्हणून मतदान केले, जगाची एक महासत्ता म्हणून मतदान केले, आपल्या समाजाच्या आणि परिसराच्या विकासासाठी मतदान केले तर? असे होइल का? भारतीय मतदार खरच सुजाण, अभ्यासू आणि जबाबदार मतदार बनेल काय?

युती तुटायला हवी का? – माझे मत

मराठी संकेतस्थळ उपक्रम येथे झालेल्या “शिवसेना – भाजपा युती तुटायला हवी का?” या चर्चेत लिहिलेला हा प्रतिसाद:

युतीचे राजकारण हे नेहमीच गरजेसाठी होते. मग ते कोणत्याही पक्षांचे असुदेत. शिवसेना – भाजपा युती हि कदाचित अशी एक युती आहे कि ती अनेकदा तुटता तुटता राहिली आहे. महाराष्ट्रातले महत्वाचे ४ राजकिय पक्ष जे म्हणवून घेतात त्यातल्या दोन (शिवसेना आणि राष्ट्रवादी) पक्षांना देशव्यापी पाठिंबा नाही. हे खरतर प्रादेशिक पक्षच म्हणायला हवेत. या दोन्ही पक्षांना सत्तेची चटक जास्त आहे. इतरांना नाही असे नाही. पण हे दोन पक्ष स्वबळावर राष्ट्रीय पातळीवर यश मिळवू शकत नाही. पण स्वतःच्या प्रादेशिक ताकतीने इतर २ राष्ट्रीय पक्षांना जेरीस आणू शकतात आणि तेच ते करत आहेत. आम्हा सामान्य मराठी लोकांना याचे आता काहीच वाटत नाही. सांगकाम्या व्यक्ती जर राष्ट्रपती झाली तर ती मराठी असल्याची लाज मात्र नक्कि वाटेल.

अलिकडचे राजकिय पडसाद पाहिले तर काहीसे असे वाटते,
१. भाजपा: चाचपडणारा राष्ट्रीय पक्ष
२. काँग्रेसः आत्ता सत्ता आहे तो पर्यंत सोनियाचे दिवस जगा. उद्या कोणी पाहिलाय? मग सत्तेसाठी वाट्टेल ते करावी लागले तरी चालेल.
३. शिवसेना: थोडी मराठी अस्मिता, थोडी कात टाकायचा प्रयत्न, स्वतःला वाघ म्हणत कळपासोबतच राहणारे, एका बाजून काँग्रेसचा चेहरा घेण्याचा प्रयत्न करणारे.
४. राष्ट्रवादी: काँग्रेस मधून फुटलेली शिवसेना, यांच्यात सगळे गुण काँग्रेसचेच पण आवेश आणि प्रादेशिकता शिवसेनेची. स्वतःला शिवसेना वाटून घ्यायला लाज वाटते. यांना काँग्रेसचे, सोनियाचे दिवस पाहवत नाहित. शरद पवार जीवंत असे पर्यंत यांचा पक्ष म्हणून प्रभाव. नंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील. जर पवारांना पंतप्रधान होण्याची खात्री दिली तर इतिहासा नुसार पवार लगेचच काँग्रेसमध्ये विलीन होतील.
५. मनसे: गरजेल तो बरसेल काय? स्वतःला स्वाभिमानी म्हणवत पुण्यात मात्र कलमाडींच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न केला. तो फसला. महाराष्ट्र नवनिर्माणाच्या घोषणा दिल्या खर्‍या पण एका गल्लीचे नवनिर्माण केले असले तर शप्पथ. नावात सेना पण एकूण राजकिय धर्म काँग्रेसचाच वाटतो.

एकुण काय? कोणा एकामध्ये ताकत नाही. युती तुटली काय आणि नाही तुटली काय? स्वबळावर लढायची आणि जिंकायची ताकत कोणाच्यातच नाही.

क्षणभर हे मानु कि शिवसेनेने मराठी म्हणून प्रतिभा पाटील-शेखावत यांना पाठिंबा दिला आहे. कलामांना विरोध करताना सेनेने सांगितलेले कारण म्हणजे त्यांनी अफजलच्या फाशीसाठी केलेला विलंब वा निर्णय न घेणे यासाठी ते हिंदुत्वाचे कार्ड वापरत आहेत आणि आत्ता मराठीपणाचे. पण प्रतिभा पाटील-शेखावत जर राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या तर त्यांनी अफजलला फाशी देण्याची हमी शिवसेनेला दिली आहे का एक मराठी पक्ष पाठिंबा देतो आहे म्हणून? हिंतुत्व आणि मराठी बाणा यामध्ये शिवसेना गोंधळलेली आहे. इकडे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्‍या या यु. पी. ए. ला शिवसेनेचा पाठिंबा कसा चालतो? तेंव्हा गप्प का? आणि तेंव्हा कुठे जाते शिवसेनेचे हिंदुत्व?

सत्तेच्या मोहापायी भारतात काहिहि होउ शकते यावर आमचा गाढ विश्वास आहे. त्यामुळे युती टिकावी का टिकु नये यावर भाष्य करणे हे हास्यास्पद आहे.

माझ्यामते आपण द्विपक्षीय राजकारण्याच्या दिशेने चाललो आहोत. त्याची हि कुठे तरी सुरूवात आहे. बराच काळ जाइल. पण द्विपक्षीय लोकशाही भारतीय स्वीकारतील. मग कसली युती अन कसल काय? आजच्या या अवस्थेला भारतीयच जबाबदार आहेत आणि भारतीय स्वतःच त्यावर तोडगा काढतील.

उद्या कम्युनिस्टांचे स्टंट वाढल्यास काँग्रेस – भाजपा युती होईल. भारताला राजकिय स्थैर्य मिळाण्यासाठी ती एक गरज बनणार आहे हे आमचे भाकित आहे.