सध्या पहावे तिकडे मंदीचा परिणाम दिसतो आहे. भारतातले तज्ञ म्हणतात कि भारताला म्हणावी तेवढी झळ बसली नाही अथवा बसणार देखील नाही. एकिकडे मंदी तर एकिकडे महागाई असा विचित्र प्रकार दिसतो आहे. म्हणजे मागणी आहे पण पुरवठा नाही की, मागणी सुद्धा नाही आणि शक्य तेवढा पुरवठा सुद्धा नाही? सगळेच विचित्र आहे. मंदीचा खरा परिणाम पाश्चिमात्य देशांमध्ये आहे. कळत नकळत पाश्चिमात्य देशांशी संबंधीत भारतातल्या व्यावसायिकांना त्याची झळ बसते आहे. निर्यात क्षेत्रामध्ये असलेल्या सर्वांना झळ बसलेली आहे. पण सर्वात ग्लॅमरस झळ आहे ती माहिती तंत्रज्ञान उद्योगाला. आता जरा तिकडेच पाहू.
माहिती – तंत्रज्ञान क्षेत्राने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. या क्षेत्रातल्या कंपन्यांना मिळणारा डॉलर आणि युरोमधला पैसा आणि भारतीय चलनामधली तफावत हा खरा या धंद्याचा खरा आधार. डॉलरला घरचा आहेर मिळाल्याने आणि ओबामाच्या सरकाराने डॉलरचा बाहेर जाण्याचा ओघ काहीसा मंदावला खरा. पण मुळातच तो इकडे येत कसा होता हे जाणून घेणे सुद्धा गरजेचे वाटते. भारतीय तंत्रज्ञ खरच बुद्धीमान आहेत हे जगजाहीर आहे. पण याच सोबत भारतीय गुलामगिरी करण्यात सुद्धा अव्वल आहेत हे ही भारतीयांना माहित असुन नसलेले सत्य आहे. बरं, त्याचा इथे काय संबंध? सांगतो. मुळातच आमच्या सारखे अनेक भारतीय आपल्या सेवा काही भारतीय आणि अभारतीय कंपन्यांना विकतात. थोडक्यात आपला मेंदू भाड्याने देतात. जे काही बनवतात ते त्यांच्यासाठीच. आता या पैकी आमच्या भारतीय कंपन्यांनी पैसा बनवला. पण तो कसा? तर जास्तीत जास्त मेंदू कमी भाड्याने घ्यायचे आणि ते जास्त भाड्याने अभारतीय कंपन्यांना द्यायचे. मधला लगदा ह्यांचा. आणि त्यात जो कोणी सर्वोत्तम मेंदू कमीत कमी भाड्याने स्वतः जवळ राखून ठेवेल तो जिंकणार.
या सगळ्या प्रकारात आम्ही मध्यमवर्गीय भारतीय उगाच स्वतःला श्रींमत असल्याची जाणीव करुन देऊ लागलो. ज्याने कधी १५००० ची स्वप्ने पाहिली होती त्याला आता अचानक ३५००० सहजच मिळू लागले. मग काय करा जोरदार काम आणि मिळवा ३५००० चे ५००००. या गणितामध्ये गणिताची पाटी आपली नाही की गणिते सुद्धा आपली नाहीत याची जाणिवच नाही. आज सगळ्यांच त्याचा काही प्रमाणात दणका बसला आहे. आता एक सत्य मान्य करु की आम्हाला गुलामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. तसेच या गुलामगिरीमधुन मुक्त करण्याचा कोणताही मार्ग अथवा नेता आमच्याकडे नाही. पण मग आपण काय करायचे? हा मधला मलिदा कमी करता येऊ शकतो? हो. नक्कीच. आपण थोडेसे धाडस करु शकतो. असे ही आज टांगती तलवार आहेच. मग ज्या सेवा आपण नोकरी म्हणून विकतो, त्याच बाजारात जाऊन विकायचा प्रयत्न केला तर? काही समविचारींना एकत्र आणून छोटे छोटे व्यावसायिक समूह बनवून आम्हीच धंदा सुरु केला तर? शेवटी आजचे मोठे उद्योग सुद्धा काही प्रमाणात असेच पुढे आले आहेत ना?
थोडक्यात सांगायचे झाले तर आता नव्याने छोटे छोटे उद्योग समूह तयार करुन, आपल्या गरजा कमी करुन आणि जास्त फायद्याचे प्रलोभन टाळून आपण एक उद्योगपती बनले तर? मला विश्वास आहे की आम्हा भारतीयांमध्ये हि कुवत नक्कीच आहे. थोडा कमी फायदा मिळवा, आपल्यासाठी, आपल्या गरजा ओळखून, उत्पादने बनवून भारतीय पैसा येथेच खेळवा आणि अनेक खारी एकत्र येऊन प्रत्येक डॉलर आणि युरो इकडे आणल्यास जगातले समाधानी आणि म्हणून सुखी कदाचित फक्त आम्हीच असू. चला तर मग, या मंदीच्या काळात व्यवसायातला हा नवा अध्याय लिहूया.
भारतीय वाहन उद्योगात फिरोदिया कुटुंबीयांचे एक वेगळे स्थान आहे. आजची फोर्स मोटर्स (अभय फिरोदिया) आणि कायनेटिक मोटर कंपनी (अरुण फिरोदिया) या दोन फिरोदिया कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. दुचाकी वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या उद्देशाने एच. के. फिरोदियांनी कायनेटिक वाहन उद्योगाची स्थापना केली. सर्व प्रथम १९७२ ला कायनेटिक लुनाचे उत्पादन सुरू झाले आणि मोपेड या वाहन क्षेत्रात कायनेटिकने आपले पाय घट्ट रोवले.
मग लुनाचे अनेक प्रकार झाले. लुना टिएफआर (एकाच व्यक्तीकरिता), लुना डबल प्लस, मॅग्नम, सुपर असेच आणि काही प्रकार झाले. खरंतर लुना हा वाहन प्रकार सायकलला पर्याय असा पुढे आला म्हणायला काही हरकत नसावी. एरवी आपोआप चालणारी अन गरज लागल्यास खरोखरच्या सायकल सारखी सुद्धा चालवण्याची सोय या वाहनात होती/आहे. या वाहनाला एकच स्पर्धक होता तो म्हणजे टिव्हीएस ५०. लुना नंतर कायनेटिक सफारी आली. पण कायनेटिक हे नाव जास्त लोकप्रिय झाले म्हणा अथवा त्यांचे जे वाहन फक्त कंपनीच्या नावानेच ओळखले गेले ती म्हणजे कायनेटिक स्कूटर होय. सायकल सदृश गाड्यांना, अवजड अन तोल सांभाळायला अवघड अश्या बजाज, एलएमएलच्या स्कूटर्सना सशक्त पर्याय म्हणजे कायनेटिकची स्कूटर. या गाडीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीने शहरातल्या स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवला.
वाट पाहून बजाजांची स्कूटर मिळवणे म्हणजे लोकांना प्रचंड कौतुक होते. या काळातच स्त्रिया सुद्धा आत्मविश्वासाने कार्यालयीन नोकरी करू लागल्या होत्या. पण त्यांचा रोजचा प्रवास म्हणजे स्वतःच्या “ह्यांच्या” स्कूटर वरून, बसने अथवा रिक्षाने. एखादी जास्त स्वावलंबी स्त्री असेल तर लुना. पण स्कूटर म्हणजे परिवाराची गाडी होती. बदका सारखा आकार, सामान ठेवायला थोडी जागा, मोपेड पेक्षा जास्त शक्ती, सोबत गियर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती, पत्नी, एक पुढे उभे राहणारे मूल आणि एक आईच्या मांडीवर बसणारे लहान मूल अशा चौकोनी कुटुंबाला वाहून नेण्याची क्षमता ही या स्कूटर्सची ठळक वैशिष्ट्ये होती.
म्हणजे, डाव्या हाताला सगळे गिअर्स आणि क्लच, पाय ठेवायच्या सपाट जागेत मध्येच डोके वर काढणारा मागच्या चाकाचा ब्रेक, एका बाजूला असलेले इंजिन आणि फक्त मधले स्टँड. तसेच बंद पडल्यास चालकाच्या बसण्याच्या जागे जवळ असलेला पेट्रोलचा नियंत्रक आणि चोक यांच्या मदतीने स्कूटर सुरू न झाल्यास, रस्त्यातच स्कूटर तिरकी करणे आणि मग पाय दुखे पर्यंत किक मारणे हा एक मोठा त्रासदायक मुद्दा असायचा. या सर्व त्रासदायक बाबी लक्षात घेऊन आणि खास करून नोकरदार स्त्रिया हा ग्राहकवर्ग डोळ्यासमोर ठेवून कायनेटिक होंडाने आपली स्कूटर बाजारात आणली.
लावण्याची व्यवस्था असलेली, स्कूटर इतकीच शक्तिशाली अन सुसाट धावणारी आणि मुख्य म्हणजे किक अथवा फक्त एक खटका दाबून सुरू होणारी अशी हि स्कूटर अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. या स्कूटरने, या वाहन प्रकारात, फक्त एक खटका दाबून सुरू होणे, गिअर बॉक्स ऐवजी व्हेरीएटर (गिअर्स टाळण्या करिता), दोन्ही ब्रेक हातात, हि नवीन वैशिष्ट्ये बाजारात आणली. कायनेटिक होंडा डिएक्स आणि झेडएक्स असे दोन प्रकार उपलब्ध होते. ९८ घनसेमी क्षमतेच्या आणि टू स्ट्रोक इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये पहिला बदल झाला तो २००१ साली. इंजिनाची क्षमता ११० घनसेमी झाली. पण बाकी सगळे तेच होते. मधल्या काळात १९९८ साली होंडा कंपनीने साथ सोडली. अन स्वतःची भारतात वेगळी चूल मांडायचे मनसुबे सत्यात आणायला सुरुवात केली. मग २००५ साली कायनेटिकने बाह्य स्वरूप तेच ठेवून ११३ घनसेमी क्षमतेचे फोर स्ट्रोक इंजिन वाली हिच स्कूटर ग्राहकांसमोर आणली. पण तोवर उशीर झाला होता. अनेक स्पर्धकांनी आपापल्या अशाच गाड्या, स्कूटरेट बाजारात आणल्या होत्या. खुद्द होंडाने ऍक्टिव्हा आणली जी ग्राहकांना आवडली.