कविता? का? कधी?

माझी अनुदिनी मीच जेव्हा उघडून पाहतो तेव्हा मला गम्मत वाटते. मी काही फुटकळ कविता आणि चारोळ्या केल्या आहेत. खरतर मीच मानतो त्या कविता आहेत असे :). पान जेव्ह्या विचार करतो कि त्या कविता अथवा चारोळ्या मी कधी आणि का केल्या? तेव्हा मनात विचार येतो कि एका ठराविक विचारांच्या ओघात, काही भावनांच्या आवेगात तर काही मित्र मैत्रिणींच्या आग्रह खातर केल्या आहेत. एकूण काय? कविता का केली? कधी केली? कोणासाठी केली याला काही संदर्भ आहेत. नंतर ते आठवत नाहीत… पण त्या क्षणी व्यक्त होण्यासाठी केलेली असते हे नक्की….

अनुभव

अनुभव, स्वत:चे कि वाचलेले? यामधले कोणते अनुभव श्रेष्ठ? या बद्दल माझ्या मनात नेहमीच एक द्वंद्व सुरु असतं. स्वत:चे अनुभव हे स्वत:च्या कृतीचे फलित असतात तर वाचलेले अनुभव हे इतरांच्या. प्रत्येक व्यक्ती ज्या प्रमाणे एक स्वतंत्र आणि वेगळे व्यक्तिमत्व असते त्याच प्रमाणे प्रत्येक प्रसंग सुद्धा वेगळा असतो. त्यातून येणारे अनुभव सुद्धा वेगळे असतात. हे जरी खरे असले तरी श्रेष्ठ कोण हा मुद्दा काही पाठ सोडत नाही.

शेवटी वाचलेले अनुभव हे सुद्धा कोणाचे तरी अनुभवच असतात. तरी सुद्धा मन तयार होत नाही मानायला. एक मान्य आहे की ते मार्गदर्शक ठरू शकतात पण तेच फक्त खरे आहेत हे मात्र अमान्य आहे.

तुम्हाला काय वाटते?

— चाणक्य ….

स्वच्छ भारत – काही गरजा

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी स्वच्छ भारत संकल्पना मांडून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये राजकीय पातळीवर घेतलेला हा सर्वात चांगला निर्णय असावा बहुतेक. पण याच सोबत आणखी काही गरजा आहेत. खास करून खालील प्रमाणे…

  1. सेलेब्रिटी: प्रमाणापेक्षा सेलेब्रिटी लोकांनी भाग घेऊन दिखाऊ पणा जास्त आणि अंमलबजावणी कमी असे होणार नाही याची काळजी घेणे.
  2. शालेय स्वच्छता: घरात स्वच्छतेचे धडे जाण्यासाठी शाळेत जाणे जास्त गरजेचे आहे. याची चांगली सुरुवात शाळेत होऊ शकते. स्वच्छता हे कोणा एका कामगाराचे काम नसून ती प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. हे पटवून स्वच्छतेची सुरुवात माझ्यापासून होते हे शालेय शिक्षणाच्या वयातच मनावर बिंबवणे गरजे आहे.
  3. सार्वजनिक स्वच्छता: आपल्याकडे सार्वजनिक स्वच्छता या सोबत माझे काहिच नाते नाही या भावनेला मूठमाती देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकशिक्षणासोबत दर १००-२०० मीटर वर छोट्या कचरा कुंड्या बसवणे गरजे आहे. जेणे करून कचरा तिथल्या तिथे जमा होईल आणि तो इतरत्र न जाता योग्य प्रकारे जमा होईल.

निदान या ३ गोष्टी मनापासून झाल्या तर आपण खरच स्वच्छ भारत पहायच्या दिशेने काही पावले पुढे जाऊ…

राजकारण – बदलता महाराष्ट्र

महाराष्ट्र कात टाकतोय. होय महाराष्ट्र कात टाकतोय. आंतर्जालावर लेखन करायला सुरु करून अंदाज एक दशक झालं. या दशकात एक आघाडीच घाणेरडे सरकार पाहिले. आम्ही धर्मनिरपेक्ष म्हणत जातीयतेची विष पेरणारी माणस पाहिली. राजकीय अभ्यासक सध्याच्या परिस्थितीला मोदी लाट म्हणतात. पण मी म्हणेन कि महाराष्ट्र कात टाकतोय.
निरंकुश सत्तेचा माज असलेल्या राजकीय नेत्यांना आज मतदारांनी वठणीवर आणलं आहे. त्यातून कोणताच पक्ष सुटला नाही. मग तो धरणात उद्योग करणारा नेता असो, कि खुर्चीचा मोह न सुटणारा पक्ष बदलेला नेता असो की अति महत्वाकांक्षेने भावनिक साद देणारा वेगळा पक्ष काढणारा नेत असो की आधी मोडेन पण वाकणार नाही बाणा ठेवून आता वाकून मोडलेला नेता. जनतेने प्रत्येकाला जागा दाखवली आहे.
महाराष्ट्राचे राजकारण पूर्वी सारखे नाक्कीच चालणार नाही. लोकाना शासन कोणाचेही असले तरी सुशासन हवे आहे. सरकारी बाबूंना थोडे दूर ठेवून आपली कामे शक्य तेवढी सुरळीत आणि लवकर हवी आहेत. सध्याचा राजकीय बद्दल हा या कौलासाठी आहे.
नव्या सरकारने हे जाणून काम केल्यास जनता सहन करेल अथवा त्यांची योग्य जागा दाखवेल. कोणत्याही पक्षाने असे मानणे मूर्खपणाचे आहे कि कौल त्यांच्या बाजूचा अथवा कोणाच्या तरी विरोधात आहे. जनतेने दिलेला कौल हा सुशासनासाठी आहे, सुराज्यासाठी आहे हे सर्वच नेत्यांनी मग ते जिंकलेले असोत आठवा हरलेले, लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

काळ सतत

येणारा काळ सतत मला खुणावतो,
मेलेल्या आयुष्यात मृत्यू मला सुखावतो..

तू सांग काहीही, मी सर्व काही जाणतो,
तुझ्या प्रत्येक गोष्टीला अजून प्रेमच मानतो…

प्रसार माध्यमे आणि आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडी

भारतात किंवा भारताबाहेर राहताना एक फरक नेहमी जाणवतो. तो म्हणजे प्रसार माध्यमामध्ये आपला देश आणि इतर देश या बद्दलच्या बातम्या. भारताबाहेर सामान्यपणे आपला देश कुठे पुढे आहे. आपले शेजारी देश, महासत्ता आणि आपली वाटचाल याबद्दल नागरिकांना समजेल अशा भाषेत माहितीवजा बातम्या पहायला मिळतात. मला वाटते की नागरिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीयदृष्ट्या साक्षर करण्यासाठी हे फार गरजेचे आणि महत्वाचे आहे.
नवे माहिती व प्रसारण मंत्री याची काळजी घेतील अशी माफक अपेक्षा आहे.