कोणीतरी

कोणीतरी म्हणालं आहे, इतरांसाठी थोडं जगून पाहावं!
स्वतः हसता हसता, दुसऱ्यासाठी थोडं रडून पाहावं!!

स्वतः जगताना, थोडंसं इतरांच्यात डोकावून पाहावं!
आपल्या दुःखात डोकावून, थोडंसं सुख त्यात पाहावं!!

कुठेतरी जायचं असताना, थोडं वाट चुकून पाहावं!
चुकलेल्या वाटेवरून, आपल्या दिशेला थोडं वळून पाहावं!!

कधीतरी वाटतं, कोणीतरी आपल्याला आपलंसं म्हणावं!
स्वतःला विसरून कोणामध्येतरी, एकदा तरी असच जगावं!!

कधीतरी स्वतः होऊन कोणासाठी तरी जगावं!
जगण्यातला आनंद थोडं तरी वाटून पाहावं!!

कोणीतरी म्हणालं आहे, थोडं असं ही जगून पाहावं!
जगता जगता थोडंसं का होईना मरून ही पाहावं!!

Advertisements

उदास

गेला आजचा दिवस,
करून मला उदास,
फक्त तुझाच सहवास,
हवा मला !!

गेला आजचा दिवस,
करून मला उदास,
फक्त तुझाच श्वास,
जगवे मला!!

गेला आजचा दिवस,
करून मला उदास,
फक्त तुझाच ध्यास,
ओढतो मला!!

गेला आजचा दिवस,
करून मला उदास,
वेडा हा चाणक्य,
स्मरतो तुला!!

जन पळभर

जन पळ भर म्हणतील हाय हाय!
मी जाता राहील कार्य काय?

किती सरळ, सोपी परंतु मनाला भिडणारी आणि आयुष्याचे सत्य सांगणारी ही कविता आहे ना? शाळेत जेव्हा शिकलो तेव्हा तर धड कळली सुद्धा नव्हती. फक्त कवितेच्या चालीमुळे लक्षात राहिली होती. पण म्हणतात ना एखादी गोष्ट मनात घर करून राहते. थोडी फार तशीच ही कविता मनातच घर करून राहिली आहे. मला नेहमीच हा प्रश्न पडत आला आहे की जेव्हा आयुष्य म्हणजे काय? हे सुद्धा माहीत झालेलं नसतं तेव्हा या असल्या कविता शिकवल्याच का? शाळेत मराठीचा अभ्यास न आवडण्याचे हे तर एक कारण नसेल? असो, सांगायचा मुद्दा हा की मृत्यूची आणि माझी ओळख या कवितेने झाली म्हणायला काही हरकत नाही. एखादी गोष्ट उदाहरणा शिवाय समजणे कठिणच तसे, मग आता मृत्यू म्हणजे काय हे कसे समजणार? अन याच उत्तर लहानपणी लहान मुलाला कोण देणार? पण यामुळे प्रश्न मनात तसाच राहून गेला.

जेव्हा होते ते आजोबा वारले तेव्हा काही जास्त जाणवलं नाही अन वय पण तसं लहानच होत. पण झालेला सगळा प्रकार पाहून चक्रावायला झालं होतं. कधी न पाहिलेली माणसं पाहिली होती. त्यामुळे गूढ जास्तच वाढलं होतं. या सुमारास मी मावशीकडे जायचे शिकवणीला. मावसं भाऊ तर फारच लहान होता. त्याला सुद्धा एक आजोबा होते. ते आजारी, एकाकी असायचे. पलंगावरून फक्त जेवण अन अशाच गरजेच्या वेळेला उठायचे. तेही आजींच्या सोबतीने. त्या आजी मात्र मला का कोणास ठाऊक मला माझ्या आजी वाटायच्या. अन त्यामुळे नकळत ते आजोबा मला माझे वाटत होते. मी त्यांच्याशी कधीच बोललो नाही. त्यांना कधीच आजींशिवाय कोणाशी बोलताना मी पाहिलं नव्हत. फक्त ऐकला होत की ते संस्कृतचे हाडाचे शिक्षक होते. आजोबा फारच थकलेले होते. त्यांचा सकाळचा दिनक्रम न्याहाळणे हे मला नित्याचे झाले होते. अभ्यास इयत्ता वाढत गेल्या, अर्धी चड्डी जाऊन पॅन्ट आली होती अन मिसरूड सुद्धा फुटली होती मला. सभोवतालचे वातावरण फारच न्यारे होते. पौगंडावस्था म्हणतात ना ते. मन बेभान असायचं. एक दिवस ते आजोबा गेल्याचे कळलं. मनात एक वेगळाच गोंधळ उडाला. काय करावं सुचेना. सगळे मावशीकडे गेले तसा मी पण गेलो. मृत पार्थिवावर करायचे सोपस्कार करणं सुरू होत. जे शव आहे ते आजोबांच आहे ते पटत नव्हत. उद्या सकाळी आजोबा आपल्याला दिसणार नाहीत या विचारानं कसकसं झालं. नकळत माझा खांदा यावेळी वापरला गेला. नदी घाटी शवाने पेट घेतला. नदीकाठचा शांत परिसर, लोकांची कुजबूज आणि ते पेटलेले शव पाहून नकळत मनात आलं.

गंगेच्या घाटावर एक प्रेत जळताना मी पाहिलं होतं
खरंच उद्या माझं सुद्धा प्रेत असंच जळणार होतं.

मी त्या घाटावरच माझ्या मृत्यूला स्वीकारलं होत. आता खरंच काही वाटत नाही. अनेकांना मृत्यूच्या विचारांनी घाबरायला होतं. कदाचित त्या जळणार्‍या प्रेताने मला सत्य समजावलं होतं. मृत्यू इतकं चांगलं काही असू शकत? हां!!! आता मृत्यू येतो कसा? किती शरीराला किती त्रास देतो. मरणार्‍यांच्या नातलगांना किती त्रास होतो हाच काय तो फरक. कधी कधी अंथरुणाला खिळलेला माणूस अन त्याची माणसं मनात म्हणतात हा सुटला तर बरं होईल, त्याची सुद्धा सुटका होईल अन आमची पण. मरण अनेक प्रश्न सोडवत काही उभे करतं. जे स्वयंसिद्ध आहेत त्याचं कुठं काय अडणार आहे कोणी गेल्याने. शेवटी काय? मला काय आणि किती फरक पडतो हाच प्रत्येकाचा प्रश्न असतो. तो मग मनात असो वा जनात.

मला मात्र आता मृत्युचं आकर्षण वाटायला लागलंय. हा हा.. घाबरू नका. मी आत्महत्या नाही करणार. मला मृत्यूमध्ये एक आनंद दिसतोय. एक पूर्णत्व. कदाचित कोणाला तरी मी नसल्याच दु:ख वाटेल. पण खरंच त्याचं काही अडणार आहे माझ्या शिवाय? मला विचाराल तर नाही अडणार. म्हणूनच मी तयार आहे जेव्हा येईल त्यावेळी माझ्या मृत्यूला स्वीकारायला… खरं आहे. त्या कवितेचा अर्थ शाळेत नाही कळला. पण आज मला पटला आणि आवडला….

जन पळ भर म्हणतील हाय हाय!
मी जाता राहील कार्य काय?