राजकारण – बदलता महाराष्ट्र

महाराष्ट्र कात टाकतोय. होय महाराष्ट्र कात टाकतोय. आंतर्जालावर लेखन करायला सुरु करून अंदाज एक दशक झालं. या दशकात एक आघाडीच घाणेरडे सरकार पाहिले. आम्ही धर्मनिरपेक्ष म्हणत जातीयतेची विष पेरणारी माणस पाहिली. राजकीय अभ्यासक सध्याच्या परिस्थितीला मोदी लाट म्हणतात. पण मी म्हणेन कि महाराष्ट्र कात टाकतोय.
निरंकुश सत्तेचा माज असलेल्या राजकीय नेत्यांना आज मतदारांनी वठणीवर आणलं आहे. त्यातून कोणताच पक्ष सुटला नाही. मग तो धरणात उद्योग करणारा नेता असो, कि खुर्चीचा मोह न सुटणारा पक्ष बदलेला नेता असो की अति महत्वाकांक्षेने भावनिक साद देणारा वेगळा पक्ष काढणारा नेत असो की आधी मोडेन पण वाकणार नाही बाणा ठेवून आता वाकून मोडलेला नेता. जनतेने प्रत्येकाला जागा दाखवली आहे.
महाराष्ट्राचे राजकारण पूर्वी सारखे नाक्कीच चालणार नाही. लोकाना शासन कोणाचेही असले तरी सुशासन हवे आहे. सरकारी बाबूंना थोडे दूर ठेवून आपली कामे शक्य तेवढी सुरळीत आणि लवकर हवी आहेत. सध्याचा राजकीय बद्दल हा या कौलासाठी आहे.
नव्या सरकारने हे जाणून काम केल्यास जनता सहन करेल अथवा त्यांची योग्य जागा दाखवेल. कोणत्याही पक्षाने असे मानणे मूर्खपणाचे आहे कि कौल त्यांच्या बाजूचा अथवा कोणाच्या तरी विरोधात आहे. जनतेने दिलेला कौल हा सुशासनासाठी आहे, सुराज्यासाठी आहे हे सर्वच नेत्यांनी मग ते जिंकलेले असोत आठवा हरलेले, लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Advertisements

मंदी आणि व्यवसायातला नवा अध्याय

सध्या पहावे तिकडे मंदीचा परिणाम दिसतो आहे. भारतातले तज्ञ म्हणतात कि भारताला म्हणावी तेवढी झळ बसली नाही अथवा बसणार देखील नाही. एकिकडे मंदी तर एकिकडे महागाई असा विचित्र प्रकार दिसतो आहे. म्हणजे मागणी आहे पण पुरवठा नाही की, मागणी सुद्धा नाही आणि शक्य तेवढा पुरवठा सुद्धा नाही? सगळेच विचित्र आहे. मंदीचा खरा परिणाम पाश्चिमात्य देशांमध्ये आहे. कळत नकळत पाश्चिमात्य देशांशी संबंधीत भारतातल्या व्यावसायिकांना त्याची झळ बसते आहे. निर्यात क्षेत्रामध्ये असलेल्या सर्वांना झळ बसलेली आहे. पण सर्वात ग्लॅमरस झळ आहे ती माहिती तंत्रज्ञान उद्योगाला. आता जरा तिकडेच पाहू.

माहिती – तंत्रज्ञान क्षेत्राने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. या क्षेत्रातल्या कंपन्यांना मिळणारा डॉलर आणि युरोमधला पैसा आणि भारतीय चलनामधली तफावत हा खरा या धंद्याचा खरा आधार. डॉलरला घरचा आहेर मिळाल्याने आणि ओबामाच्या सरकाराने डॉलरचा बाहेर जाण्याचा ओघ काहीसा मंदावला खरा. पण मुळातच तो इकडे येत कसा होता हे जाणून घेणे सुद्धा गरजेचे वाटते. भारतीय तंत्रज्ञ खरच बुद्धीमान आहेत हे जगजाहीर आहे. पण याच सोबत भारतीय गुलामगिरी करण्यात सुद्धा अव्वल आहेत हे ही भारतीयांना माहित असुन नसलेले सत्य आहे. बरं, त्याचा इथे काय संबंध? सांगतो. मुळातच आमच्या सारखे अनेक भारतीय आपल्या सेवा काही भारतीय आणि अभारतीय कंपन्यांना विकतात. थोडक्यात आपला मेंदू भाड्याने देतात. जे काही बनवतात ते त्यांच्यासाठीच. आता या पैकी आमच्या भारतीय कंपन्यांनी पैसा बनवला. पण तो कसा? तर जास्तीत जास्त मेंदू कमी भाड्याने घ्यायचे आणि ते जास्त भाड्याने अभारतीय कंपन्यांना द्यायचे. मधला लगदा ह्यांचा. आणि त्यात जो कोणी सर्वोत्तम मेंदू कमीत कमी भाड्याने स्वतः जवळ राखून ठेवेल तो जिंकणार.

या सगळ्या प्रकारात आम्ही मध्यमवर्गीय भारतीय उगाच स्वतःला श्रींमत असल्याची जाणीव करुन देऊ लागलो. ज्याने कधी १५००० ची स्वप्ने पाहिली होती त्याला आता अचानक ३५००० सहजच मिळू लागले. मग काय करा जोरदार काम आणि मिळवा ३५००० चे ५००००. या गणितामध्ये गणिताची पाटी आपली नाही की गणिते सुद्धा आपली नाहीत याची जाणिवच नाही. आज सगळ्यांच त्याचा काही प्रमाणात दणका बसला आहे. आता एक सत्य मान्य करु की आम्हाला गुलामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. तसेच या गुलामगिरीमधुन मुक्त करण्याचा कोणताही मार्ग अथवा नेता आमच्याकडे नाही. पण मग आपण काय करायचे? हा मधला मलिदा कमी करता येऊ शकतो? हो. नक्कीच. आपण थोडेसे धाडस करु शकतो. असे ही आज टांगती तलवार आहेच. मग ज्या सेवा आपण नोकरी म्हणून विकतो, त्याच बाजारात जाऊन विकायचा प्रयत्न केला तर? काही समविचारींना एकत्र आणून छोटे छोटे व्यावसायिक समूह बनवून आम्हीच धंदा सुरु केला तर? शेवटी आजचे मोठे उद्योग सुद्धा काही प्रमाणात असेच पुढे आले आहेत ना?

थोडक्यात सांगायचे झाले तर आता नव्याने छोटे छोटे उद्योग समूह तयार करुन, आपल्या गरजा कमी करुन आणि जास्त फायद्याचे प्रलोभन टाळून आपण एक उद्योगपती बनले तर? मला विश्वास आहे की आम्हा भारतीयांमध्ये हि कुवत नक्कीच आहे. थोडा कमी फायदा मिळवा, आपल्यासाठी, आपल्या गरजा ओळखून, उत्पादने बनवून भारतीय पैसा येथेच खेळवा आणि अनेक खारी एकत्र येऊन प्रत्येक डॉलर आणि युरो इकडे आणल्यास जगातले समाधानी आणि म्हणून सुखी कदाचित फक्त आम्हीच असू.  चला तर मग, या मंदीच्या काळात व्यवसायातला हा नवा अध्याय लिहूया.

पुरोगामी कोल्हापूर आणि बेगडी धर्मांधता

गेले काही दिवस/आठवडे/महिने कोल्हापूरातला विश्वशांती यज्ञ गाजतो आहे. गाजायला तशी वेगवेगळी कारणे आहेत. कोल्हापूरचा पुरोगामीपणा दाखवण्यात तेथील राजकारणी एकदम सरसावले आहेत. नाण्याचा दोन्ही बाजूंप्रमाणे यज्ञ विरोधक आणि समर्थक आपापल्या मुद्यांसह पुढे येत आहेत. उपक्रम सारख्या संकेतस्थळांवर यावर चर्चा सुद्धा झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व पातळीवर विरोध करुन सुद्धा हा यज्ञ पार पडतो आहे. असा हा यज्ञ होणे हा काही प्रमाणात लोकशाहीचा विजय मानला पाहिजे. कधी नव्हे ते हिंदू धर्मातल्या काही गोष्टींना विरोध करणे याला कोल्हापूरात पुरोगामीपणा मानले जाते त्या कोल्हापूरात विरोध होऊन सुद्धा हा यज्ञ पार पडतो आहे. अनेकांनी मुद्दे मांडले. त्यातला सर्वात चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे अन्न पदार्थांची नासाडी. मी सुद्धा या कारणासाठी आक्षेप नोंदवेन. पण विरोध नाही. नासाडी न करता काही करता येत असेल तर जरुर करा.

कोल्हापूरात या गोष्टीचा कर्मकांडाचे स्तोम असा प्रचार सुरु आहे. जो आम्ही वृत्तपत्रातुन वाचतो आहे. पण स्वतःला पुरोगामी म्हणणारे हे विरोधक पुरोगामी नाहीत तर खर्‍या अर्थाने धर्मांध आहेत असे मी तरी म्हणेन.  आपल्या भारतात धर्मवेड्या लोकांचा धर्मांध म्हटले जाते. पण धार्मिक गोष्टींना, फक्त राजकिय स्वार्थासाठी विरोध करणे अथवा फक्त एका धर्माची मते मिळवण्यासाठी त्यांची भलामण करणे या सर्वस्वी आंधळ्या कृत्ये करणार्‍यांना मी धर्मांध म्हणेन. कोणत्याही धर्माच्या एखाद्या गोष्टीचा राजकिय हेतुसाठी विरोध अथवा समर्थन याला मी धर्मांधता म्हणेन.

आता जर हा विरोध नासाडीसाठी होतो आहे तर सरते शेवटी हि अन्नाची म्हणजेच पैस्याची नासाडी झाली. मग ती काही लोकांच्या समाधानासाठी आहे तरी सुद्धा. पण हे मान्य करताना, मुठभर लोकांच्या धार्मिक यात्रेसाठी कोट्यावधी रुपयांची नासाडी कशी चालते? हा कोट्यावधीचा निधी विकास कामांसाठी नक्कीच वापरता येऊ शकतो. तसेच लोकशाहीमध्ये इतर कोणत्या धर्मासाठी अशी तरतुद सुद्धा दिसत नाही. मग हे असे करणे ही सुद्धा धर्मांधता नाही का? आणि जर हे मुद्दे हिंदू नेत्यांनी काढले तर ही धर्मांधता कशी?

थोडक्यात काय? स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणर्‍या कोल्हापुरातल्या (कोल्हापूर – गाव तसं चांगल पण वेशीला टांगल!!) नेत्यांना यज्ञाची कृत्ये धर्मांध वाटतात. पण कोल्हपूरच्या विकासाचे आणि अनेक अनुत्तरीत प्रश्न मात्र बोलावेसे वाटत नाहीत. त्यांची हि कृत्ये लोकशाही धर्माविरुद्ध नाहीत का? मी तर याच लोकांना सर्वप्रकारे धर्मांध म्हणेन….मी आणि ओबामा

काल पासुन जिकडे पहावे तिकडे फक्त ओबामा हे एकमेव नाव दिसते आहे. ओसामा विरुद्द सुरु केलेली लढाई बुश अप्रक्षरित्या ओबामा सोबत हरला. असो. आता जे शीर्षक आहे “मी आणि ओबामा” या बद्दल.  मित्र हो, एखादा माणूस प्रसिद्ध झाला की प्रत्येकजण त्याच्याशीआपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध लावून मी पण त्याच गोत्यातल्या हे ठसवायचा प्रयत्न करतो. मी काहीसे तसेच करणार आहे. :). घाबरू नका, वैतागु नका. मला ओबामांचे कौतुक वाटते म्हणूनच माझा आणि त्यांचा संबंध. बाकी काही एक नाही.
– “खरतर अमेरिकेतल्या मराठी लोकांच्या तिथल्या राजकिय ज्ञानासमोर माझे ज्ञान म्हणजे समुद्रातला एक थेंब. अमेरिकेत दर चार वर्षांनी अधक्षपदाच्या निवडणुका होतात आणि अमेरिका ही जगातली महासत्ता असल्याने सर्व जगाचे त्या निवडणुकांकडे लक्ष आहे. हे आमचे ज्ञान. तसेच  महासत्ता म्हणून मिरवणारे लोकं बुश सारख्या माणसाला निवडून देतात. त्यामुळे त्यांच्या राजकिय बुद्धी बद्दल काय तर्क करायचे याचे देखील आम्हाला कोडे पडते. असो, मला ओबामाचे कौतुक वाटते म्हणजे त्याने अमेरिकनांना आणि अप्रत्यक्षरित्या जगाला संदेश दिलायेस!! वुई कॅन!!” अर्थातच आम्ही ठरवलं तर नक्कीच करु शकतो.

राजकारण सगळीकडे जवळपास एक सारखंच. तरुण पिढीचे या बद्दलचे मत म्हणजे, या बद्दल काही एक केले जाऊ शकत नाही. सम्स्त मानवजातीला निराशेच्या गर्तेत फेकायाची शक्ति असलेल्या लोकांचा एक पाशवी खेळ. आमचे असे काहीसे मत गेल्या दशक भरात झाले होते. वर्ण, धर्म आणि जात यांचा आधार घेत विकासाचे मुद्दे कसे बाजूला ढकलता येतात याचे मुर्तीमंत उदाहरण द्यायचे झाले तर लोकं भारताकडे नक्कीच बोट दाखवतील. तर, अशा या राजकिय नैराश्याने ग्रासलेल्या भारताचे आम्ही नागरीक, ज्यांच्या रोजच्या रोजी रोटीचाकाही भाग अमेरिकेवर अवलंबुन होऊ लागला आहे, अशा आमचे डोळे या निवडणुकांच्या निकालाकडे लागले होते.
ओबामांनी योग्य मुद्दे योग्य प्रकारे मांडून विजय मिळवला आहे. हो!! आम्ही बदल घडवू शकतो हा विश्वास सम्स्त जगताला दिला आहे. बाकी अमेरिके संदर्भातले निर्णय ओबामा घेतीलच. पण त्याच सोबत माझ्या सारख्या असंख्य तरुणांना, तुम्ही बदल घडवून आणू शकता हाविश्वास दिला आहे.
माझ्यात हा विश्वास ओबामानी ओतला आहे आणि म्हणूनच माझे आणि ओबामाचे असे काहीसे नाते आहे. आता येणार्‍या काही महिन्यात भारतात लोकसभेच्या निवडणुका आहेत. काही चमत्कार नक्कीच घडणार नाहीत. राजकिय पक्षांनी योग्य प्रकार वातावरण निर्मिती सुरुकेली आहे. या वातावरणात खरतर भारताला एका ओबामाची गरज आहे. तो कदाचित माझ्यात आहे, तुमच्यात आहे. कदाचित या निवडणुकीत एका ओबामाचा जन्म होणार आहे. अन येत्या दशकात भारताला धर्म/जात/भाषा यांच्या तंट्यातुन बाहेर काढून एका परिपक्व राष्ट्रात नेणारआहे. आशा करुयात की उद्याच्या भारतात आपण सुद्धा एक ओबामा पाहूया. आपण सुद्धा ओबामा बनुया. कारण अशक्य असं काहीच नाही. ओबामा स्वतःच म्हटले आहेत – “येस! वुई कॅन!!”

काही नाही ठीक

लेखाचे शीर्षक वाचून काहीच उलगडा नाही ना झाला? महाविद्यालयात असताना कोणती गाडी घेणार अस म्हटलं की आमचं एक उत्तर असायचं – काही नाही ठीक. अरे हे काही नाही ठीक म्हणजे काय? मग आम्ही सांगायचो, काही नाही ठीक म्हणजे कायनेटिक. 🙂

भारतीय वाहन बाजारावर एके काळी अधिराज्य गाजवणारा हा उद्योग समूह आणि त्यांची एक गाडी जी फक्त कंपनीच्या नावानेच आजवर ओळखली गेली/जाते, त्या गाडीची थोडी माहिती वाचण्या पूर्वी, या कंपनी बद्दल थोडे फार …

Luna TFR Luna Super भारतीय वाहन उद्योगात फिरोदिया कुटुंबीयांचे एक वेगळे स्थान आहे. आजची फोर्स मोटर्स (अभय फिरोदिया) आणि कायनेटिक मोटर कंपनी (अरुण फिरोदिया) या दोन फिरोदिया कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. दुचाकी वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या उद्देशाने एच. के. फिरोदियांनी कायनेटिक वाहन उद्योगाची स्थापना केली. सर्व प्रथम १९७२ ला कायनेटिक लुनाचे उत्पादन सुरू झाले आणि मोपेड या वाहन क्षेत्रात कायनेटिकने आपले पाय घट्ट रोवले.

Kinetic Honda DX and ZX मग लुनाचे अनेक प्रकार झाले. लुना टिएफआर (एकाच व्यक्तीकरिता), लुना डबल प्लस, मॅग्नम, सुपर असेच आणि काही प्रकार झाले. खरंतर लुना हा वाहन प्रकार सायकलला पर्याय असा पुढे आला म्हणायला काही हरकत नसावी. एरवी आपोआप चालणारी अन गरज लागल्यास खरोखरच्या सायकल सारखी सुद्धा चालवण्याची सोय या वाहनात होती/आहे. या वाहनाला एकच स्पर्धक होता तो म्हणजे टिव्हीएस ५०. लुना नंतर कायनेटिक सफारी आली. पण कायनेटिक हे नाव जास्त लोकप्रिय झाले म्हणा अथवा त्यांचे जे वाहन फक्त कंपनीच्या नावानेच ओळखले गेले ती म्हणजे कायनेटिक स्कूटर होय. सायकल सदृश गाड्यांना, अवजड अन तोल सांभाळायला अवघड अश्या बजाज, एलएमएलच्या स्कूटर्सना सशक्त पर्याय म्हणजे कायनेटिकची स्कूटर. या गाडीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीने शहरातल्या  स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवला.

भारतीत वाहन उद्योगात ८० चे दशक म्हणजे बजाजच्या स्कूटरचा सुकाळ होता. काही पैसे भरून, 4S वाट पाहून बजाजांची स्कूटर मिळवणे म्हणजे लोकांना प्रचंड कौतुक होते. या काळातच स्त्रिया सुद्धा आत्मविश्वासाने कार्यालयीन नोकरी करू लागल्या होत्या. पण त्यांचा रोजचा प्रवास म्हणजे स्वतःच्या “ह्यांच्या” स्कूटर वरून, बसने अथवा रिक्षाने. एखादी जास्त स्वावलंबी स्त्री असेल तर लुना. पण स्कूटर म्हणजे परिवाराची गाडी होती. बदका सारखा आकार, सामान ठेवायला थोडी जागा, मोपेड पेक्षा जास्त शक्ती, सोबत गियर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती, पत्नी, एक पुढे उभे राहणारे मूल आणि एक आईच्या मांडीवर बसणारे लहान मूल अशा चौकोनी कुटुंबाला वाहून नेण्याची क्षमता ही या स्कूटर्सची ठळक वैशिष्ट्ये होती.

याच काळात भारतीय वाहन उद्योगात जपानी कंपन्यांनी प्रवेश केला. १९८४ साली कायनेटिकने जगप्रसिद्ध होंडा कंपनी बरोबर सामंजस्य स्वीकारले आणि स्कूटरचे उत्पादन सुरू केले. वर लिहिल्या प्रमाणे बजाज- एलएमएलच्या स्कूटरची ठळक वैशिष्ट्ये होतीच. पण त्याच सोबत काही वेळा स्कूटर्सची अशी काही वैशिष्ट्ये होती की जी डोके दुखी ठरायची. त्यातली काही Nova 135 म्हणजे, डाव्या हाताला सगळे गिअर्स आणि क्लच, पाय ठेवायच्या सपाट जागेत मध्येच डोके वर काढणारा मागच्या चाकाचा ब्रेक, एका बाजूला असलेले इंजिन आणि फक्त मधले स्टँड. तसेच बंद पडल्यास चालकाच्या बसण्याच्या जागे जवळ असलेला पेट्रोलचा नियंत्रक आणि चोक यांच्या मदतीने स्कूटर सुरू न झाल्यास, रस्त्यातच स्कूटर तिरकी करणे आणि मग पाय दुखे पर्यंत किक मारणे हा एक मोठा त्रासदायक मुद्दा असायचा.  या सर्व त्रासदायक बाबी लक्षात घेऊन आणि खास करून नोकरदार स्त्रिया हा ग्राहकवर्ग डोळ्यासमोर ठेवून कायनेटिक होंडाने आपली स्कूटर बाजारात आणली.

कमी पसारा असलेली, दिसायला सुंदर, काही तरी नवे वाहन असा ठसा उमटवणारी, मुख्य म्हणजे, इंजिन मध्यभागी असल्याने तोल सांभाळायला सोपी, गिअर विरहित, त्यामुळे चालवायला सहज सोपी, बसायला एकसंध आणि मोठी सीट, पेट्रोल नियंत्रकाची – चोकची कटकट नसलेली, वाहनक्षमता स्कूटर इतकीच असलेली, एका बाजूला कलून Flyte लावण्याची व्यवस्था असलेली, स्कूटर इतकीच शक्तिशाली अन सुसाट धावणारी आणि मुख्य म्हणजे किक अथवा फक्त एक खटका दाबून सुरू होणारी अशी हि स्कूटर अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. या स्कूटरने, या वाहन प्रकारात, फक्त एक खटका दाबून सुरू होणे, गिअर बॉक्स ऐवजी व्हेरीएटर (गिअर्स टाळण्या करिता), दोन्ही ब्रेक हातात, हि नवीन वैशिष्ट्ये बाजारात आणली. कायनेटिक होंडा डिएक्स आणि झेडएक्स असे दोन प्रकार उपलब्ध होते. ९८ घनसेमी क्षमतेच्या आणि टू स्ट्रोक इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये पहिला बदल झाला तो २००१ साली. इंजिनाची क्षमता ११० घनसेमी झाली. पण बाकी सगळे तेच होते. मधल्या काळात १९९८ साली होंडा कंपनीने साथ सोडली. अन स्वतःची भारतात वेगळी चूल मांडायचे मनसुबे सत्यात आणायला सुरुवात केली. मग २००५ साली कायनेटिकने बाह्य स्वरूप तेच ठेवून ११३ घनसेमी क्षमतेचे फोर स्ट्रोक इंजिन वाली हिच स्कूटर ग्राहकांसमोर आणली.  पण तोवर उशीर झाला होता. अनेक स्पर्धकांनी आपापल्या अशाच गाड्या, स्कूटरेट बाजारात आणल्या होत्या. खुद्द होंडाने ऍक्टिव्हा आणली जी ग्राहकांना आवडली.

कायनेटिकने स्पर्धा म्हणावी तेवढी योग्य प्रकार हाताळली नाही. मग ती स्कूटरेट प्रकारातली प्राइड असो,  कायनी, नोवा अथवा त्यांच्या मोटर सायकल असोत, अथवा स्टेप थ्रु,  अथवा आयात केलेल्या इतर कंपन्यांच्या गाड्या. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात कायनेटिक म्हणावी तेवढी यशस्वी ठरली नाही. आज सुद्धा कायनेटिक नव्या गाड्या सादर करत आहे.

बिपाशा बसूला घेऊन केलेल्या जाहिरातीमुळे फ्लाईट नावाची स्कूटरेट थोडी फार विकली जात आहे. पण तीन गिनेज रेकॉर्ड करणार्‍या कायनेटिक होंडाच्या स्कूटरच्या यशाची उंची गाठणे अवघडच दिसते आहे.

अरुण फिरोदियांच्या कन्या, सुलज्जा फिरोदिया-मोटवानी या कंपनीची कमान सांभाळत आहेत. पण पूर्वीचे यश अन आजची स्पर्धा पाहिल्यावर जर त्यांना कोणी विचारलं, कस काय चाललंय सगळं तर त्या नक्कीच म्हणती, फार खास असं, काही नाही ठीक…..युती तुटायला हवी का? – माझे मत

मराठी संकेतस्थळ उपक्रम येथे झालेल्या “शिवसेना – भाजपा युती तुटायला हवी का?” या चर्चेत लिहिलेला हा प्रतिसाद:

युतीचे राजकारण हे नेहमीच गरजेसाठी होते. मग ते कोणत्याही पक्षांचे असुदेत. शिवसेना – भाजपा युती हि कदाचित अशी एक युती आहे कि ती अनेकदा तुटता तुटता राहिली आहे. महाराष्ट्रातले महत्वाचे ४ राजकिय पक्ष जे म्हणवून घेतात त्यातल्या दोन (शिवसेना आणि राष्ट्रवादी) पक्षांना देशव्यापी पाठिंबा नाही. हे खरतर प्रादेशिक पक्षच म्हणायला हवेत. या दोन्ही पक्षांना सत्तेची चटक जास्त आहे. इतरांना नाही असे नाही. पण हे दोन पक्ष स्वबळावर राष्ट्रीय पातळीवर यश मिळवू शकत नाही. पण स्वतःच्या प्रादेशिक ताकतीने इतर २ राष्ट्रीय पक्षांना जेरीस आणू शकतात आणि तेच ते करत आहेत. आम्हा सामान्य मराठी लोकांना याचे आता काहीच वाटत नाही. सांगकाम्या व्यक्ती जर राष्ट्रपती झाली तर ती मराठी असल्याची लाज मात्र नक्कि वाटेल.

अलिकडचे राजकिय पडसाद पाहिले तर काहीसे असे वाटते,
१. भाजपा: चाचपडणारा राष्ट्रीय पक्ष
२. काँग्रेसः आत्ता सत्ता आहे तो पर्यंत सोनियाचे दिवस जगा. उद्या कोणी पाहिलाय? मग सत्तेसाठी वाट्टेल ते करावी लागले तरी चालेल.
३. शिवसेना: थोडी मराठी अस्मिता, थोडी कात टाकायचा प्रयत्न, स्वतःला वाघ म्हणत कळपासोबतच राहणारे, एका बाजून काँग्रेसचा चेहरा घेण्याचा प्रयत्न करणारे.
४. राष्ट्रवादी: काँग्रेस मधून फुटलेली शिवसेना, यांच्यात सगळे गुण काँग्रेसचेच पण आवेश आणि प्रादेशिकता शिवसेनेची. स्वतःला शिवसेना वाटून घ्यायला लाज वाटते. यांना काँग्रेसचे, सोनियाचे दिवस पाहवत नाहित. शरद पवार जीवंत असे पर्यंत यांचा पक्ष म्हणून प्रभाव. नंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील. जर पवारांना पंतप्रधान होण्याची खात्री दिली तर इतिहासा नुसार पवार लगेचच काँग्रेसमध्ये विलीन होतील.
५. मनसे: गरजेल तो बरसेल काय? स्वतःला स्वाभिमानी म्हणवत पुण्यात मात्र कलमाडींच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न केला. तो फसला. महाराष्ट्र नवनिर्माणाच्या घोषणा दिल्या खर्‍या पण एका गल्लीचे नवनिर्माण केले असले तर शप्पथ. नावात सेना पण एकूण राजकिय धर्म काँग्रेसचाच वाटतो.

एकुण काय? कोणा एकामध्ये ताकत नाही. युती तुटली काय आणि नाही तुटली काय? स्वबळावर लढायची आणि जिंकायची ताकत कोणाच्यातच नाही.

क्षणभर हे मानु कि शिवसेनेने मराठी म्हणून प्रतिभा पाटील-शेखावत यांना पाठिंबा दिला आहे. कलामांना विरोध करताना सेनेने सांगितलेले कारण म्हणजे त्यांनी अफजलच्या फाशीसाठी केलेला विलंब वा निर्णय न घेणे यासाठी ते हिंदुत्वाचे कार्ड वापरत आहेत आणि आत्ता मराठीपणाचे. पण प्रतिभा पाटील-शेखावत जर राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या तर त्यांनी अफजलला फाशी देण्याची हमी शिवसेनेला दिली आहे का एक मराठी पक्ष पाठिंबा देतो आहे म्हणून? हिंतुत्व आणि मराठी बाणा यामध्ये शिवसेना गोंधळलेली आहे. इकडे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्‍या या यु. पी. ए. ला शिवसेनेचा पाठिंबा कसा चालतो? तेंव्हा गप्प का? आणि तेंव्हा कुठे जाते शिवसेनेचे हिंदुत्व?

सत्तेच्या मोहापायी भारतात काहिहि होउ शकते यावर आमचा गाढ विश्वास आहे. त्यामुळे युती टिकावी का टिकु नये यावर भाष्य करणे हे हास्यास्पद आहे.

माझ्यामते आपण द्विपक्षीय राजकारण्याच्या दिशेने चाललो आहोत. त्याची हि कुठे तरी सुरूवात आहे. बराच काळ जाइल. पण द्विपक्षीय लोकशाही भारतीय स्वीकारतील. मग कसली युती अन कसल काय? आजच्या या अवस्थेला भारतीयच जबाबदार आहेत आणि भारतीय स्वतःच त्यावर तोडगा काढतील.

उद्या कम्युनिस्टांचे स्टंट वाढल्यास काँग्रेस – भाजपा युती होईल. भारताला राजकिय स्थैर्य मिळाण्यासाठी ती एक गरज बनणार आहे हे आमचे भाकित आहे.

अनय

अनय, हे नाव काहिंना माहित असेल तर काहिंना अजिबातच माहित नसेल. मला सुद्धा फार काही माहित नाही. मला एवढच माहित आहे कि अनय हा राधेचा पती. आता राधा कोण? असे मात्र फार कमी लोक विचारतील. पण राधा अनय बद्दल बोलतानाच “राधा कोण?” या प्रश्नाचे जे उत्तर मिळते तेच अनेक प्रश्न पुन्हा उभे करून जाते. तर, परत तो प्रश्न आलाच. राधा कोण? राधा हि कृष्णाची राधा. आता जिथे आपण अनयला राधाचा पती म्हणतो तिथेच राधा कृष्णाची म्हणतो? याला काय म्हणावे? प्रेमाची नाती? नात्यांची चेष्टा की प्रेमाची चेष्टा? नक्कि काय?
अनयचं नाव आलं की माझ्या मनात हे असे प्रश्न येतात आणि ते नेहमीच अनुत्तरीत राहतात. आजुबाजूला पाहिलं तर मला अनेक अनय दिसतात. एक काळ होता जेंव्हा प्रेमविवाह म्हणजे एक धाडस असायचं. आता आजच्या जगात प्रत्येकजण प्रेम करतो. कदाचित काहिजण अव्यक्त, काहि जण यशस्वी आणि काहिजण अयशस्वी तर काहि जण लग्ना नंतर आपल्या पती/पत्नीवर. जे पती पत्नी एकमेकांवर लग्नानंतर प्रेम करतात, प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ देतात ते खरच नशीबंवान. पण जे अनय आहेत त्यांच काय? आता त्यांच्या पत्नीच पहिल प्रेम त्यांच्यावर नसेल तर त्यांचा काय दोष? कदाचित त्या राधांचं पहिल प्रेम कोणा व्यक्तिवर असेल, त्यांच्या स्वप्नावर असेल वा त्यांन्या स्वप्नांच्या गावी नेणार्‍या त्यांच्या स्वप्नातल्या जोडीदारावर असेल. खरा जोडीदार त्यांना ते कधीच देउ शकणार नाही जे त्यांना हवं होत. त्या अनयशी लग्न करतात. पण त्याला आपला प्रियकर नाही बनवू शकत. तो असतो फक्त एक पती. त्यांच्यावर प्रेम करणारा. पण आपण एक स्वीकृत पती आहोत, निवडक नाही या दुय्यम भावनेन जगणारा.
राधेच लग्न अनयशी झालं खरं. समाज मात्र म्हणताना राधा-शाम म्हणतो. आज सुद्धा अनेक राधा आपला शाम आठवत राहतात आणि अनयशी नातं जोडतात. पण या अनयला मात्र राधा आपल्यावर प्रेम करते हे समजावचं लागत कारण समाजाला या नात्यांमध्ये त्या अनयची राधा दिसत नाही की सत्यातल्या राधेचा शाम मान्य होत नाही. जे काही खर आहे ते त्या अनयला माहित आणि आजच्या अनयला माहित. आज सुद्धा अनय मात्र तोच आहे. दुय्यम, एक राधा स्वीकृत, समाज स्वीकृत, राधेचा पती…..